पाकिस्तानच्या केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याला परवानगी दिली आहे. भारत-पाक संबंधावर आधारित असलेला एखादा भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, बजरंगी भाईजान पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यापूर्वी चित्रपटातील काही भाग वगळण्याची अट पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने ठेवली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये प्रचंड चर्चा आहे. यापूर्वी भारत-पाक संबंधांवर आधारित असलेल्या अनेक चित्रपटांना पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. यामध्ये ‘एक था टायगर’, ‘एजंट विनोद’, ‘हैदर’, ‘बेबी’, ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटांचा समावेश होता. मात्र, आम्ही काही अटींवर ‘बजरंगी भाईजान’ला प्रदर्शनाची परवानगी देत असल्याची माहिती पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष मोबासिर हसन यांनी दिली. विशेष म्हणजे बजरंगी भाईजानसाठी सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शित करण्याचा दिवसही बदलला असून भारताप्रमाणे हा चित्रपट ईदलाच पाकिस्तानात प्रदर्शित केला जाईल.
सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ पाकिस्तानात प्रदर्शित होणार!
पाकिस्तानच्या केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याला परवानगी दिली आहे.
First published on: 14-07-2015 at 04:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan bajrangi bhaijaan to release in pakistan with cuts