बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यातील बहुचर्चित शीतयुद्ध आता संपुष्टात आले असले तरी, ‘फोर्ब्स इंडिया’कडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आघाडीच्या १०० सेलिब्रिटींच्या यादीमुळे पुन्हा एकदा दोघांमध्ये मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. कारण, फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत सलमानने किंग शाहरूखनच्या पहिल्या स्थानावर कब्जा केला . मागील वर्षी पहिल्या स्थानावर असणाऱ्या शाहरूखची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. फोर्ब्सकडून या वर्षासाठीच्या खेळाडू, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आणि विनोदी कलाकार अशा विविध क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली . प्रसिद्धी आणि पैसा या निकषांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या यादीमध्ये संबंधित व्यक्तींनी १ ऑक्टोबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१४ या काळात केलेल्या कमाईची तुलनात्मक पाहणी करण्यात आली आहे.
वर्षभर शाहरूख खान ‘हॅपी न्यू इयर’ या एकाच चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे मनोरंजन सृष्टीतील त्याचा वावर कमी राहिला होता. ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही चित्रपटात त्याने काम केले नसल्याने त्याच्या कमाईवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. याउलट यंदाच्या वर्षी सलमानच्या ‘किक’, ‘जय हो’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. याशिवाय, टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या मालिकेमुळेही सलमान चांगलाच चर्चेत राहिला.
यंदा विविध चित्रपटातून सशक्त स्त्री-भूमिका साकारणाऱ्या दीपिकानेही आघाडीच्या दहा बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये स्थान पटकावले आहे. तिने ‘फाईडिंग फॅनी’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटांच्या माध्यमातून तब्बल ६७,२० कोटींची कमाई करत यादीत आठवे स्थान मिळवले आहे. बिग बी अमिताभ यांनी २०१४मध्ये १९६.७५ कोटींची कमाई करत सलमानपाठोपाठ (२४४.५० कोटी) यादीमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर, शाहरूख खान २०२.४० कोटींच्या कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे. ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाद्वारे ठिकठाक कमाई करणाऱ्या शाहरूखने ब्रँड व्हॅल्यूच्या स्पर्धेत मात्र आघाडी घेतली आहे. सध्या त्याच्याकडे सर्वात जास्त म्हणजे २२ ब्रँड असल्याचे सांगण्यात येत आहे. तर खेळाडूंच्या यादीत धोनी सर्वाधिक (१४१.८० कोटी) कमावणारा खेळाडू ठरला आहे.
‘फोर्ब्स’च्या यादीत सलमानची शाहरूखवर मात
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यातील बहुचर्चित शीतयुद्ध आता संपुष्टात आले असले तरी, 'फोर्ब्स इंडिया'कडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आघाडीच्या
First published on: 12-12-2014 at 04:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan dethrones srk in forbes 2014 celebrity 100 list