एखादा चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरला की, त्या चित्रपटातील अभिनेते व अभिनेत्री यांच्या वेशभूषा व केशभूषेविषयी हमखास चर्चा होत असते. सध्या २०० कोटींचा गल्ला जमविणाऱ्या ‘सुलतान’ चित्रपटातील लंगोटधारी सलमान खानचीदेखील अशीच चर्चा सुरू आहे. कसलेल्या मल्लाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सलमान खानने परिधान केलेला लंगोट आणि त्यावर घातलेली किस्ताक विशेषकरून लक्षात राहते, हा लंगोट व किस्ताक शिवण्याचे काम केले आहे भाईंदरमधले पैलवान रुपचंद माने यांनी.
लहानपणापासूनच आखाडय़ातील लाल माती अंगाला फासत कुस्तीचे डाव खेळलेले रुपचंद माने हे मुंबई व आसपासच्या परिसरातील एकमेव लंगोट व किस्ताक शिवणारे शिंपी. कुस्ती खेळण्याचा छंद आजही कायम जपत पोटापाण्यासाठी वाहनचालकाची नोकरी सांभाळून फावल्या वेळेत माने लंगोट व किस्ताक शिवण्याचे काम करतात. कुस्तिगीरांना लागणारे लंगोट व त्यावरील किस्ताक ही विशेष खुबीने शिवली जाते, त्यासाठी अनुभवाचीच गरज असते. त्यामुळे शिंपीकाम करणारे इतर कुस्तिगीरांचे लंगोट व किस्ताक शिवत नाहीत. ही कला रुपचंद माने यांनी साध्य केली आहे आणि त्यामुळेच थेट सलमान खानचे लंगोट शिवण्याची संधी त्यांनी उपलब्ध झाली.
‘सुलतान’चे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर कसलेल्या
मल्लाची भूमिका साकारणाऱ्या सलमान खानला कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी भारतकेसरी जगदीश काली रामन यांची नेमणूक करण्यात आली. मात्र कुस्तीचा सराव करायचा तर लंगोट व किस्ताक हवीच. मग शोध सुरू झाला या दोन्ही गोष्टी शिवणाऱ्याचा. या शोधातून कालीरामन यांना रुपचंद माने यांचे नाव समजले आणि माने यांना सांगावा धाडण्यात आला.
थेट सलमानसाठी लंगोट व किस्ताक शिवायची म्हटल्यावर माने यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मिळालेली ही संधी त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या कानावर घातली. सुरुवातीला कोणाचाच त्यावर विश्वास बसेना.
मग एक दिवस माने यांना सलमानची मापे घेण्यास बोलाविण्यात आले. सुट्टीचा दिवस पाहून माने यांनी चित्रीकरण सुरू असलेली गोरेगावची चित्रनगरी गाठली. सलमानसमोर उभे राहिल्यावर त्याची मापे घेताना माने यांना सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटत होते, परंतु सलमानच्या मोकळ्या स्वभावामुळे त्यांच्या मनावरचे दडपण दूर झाले. दोन दिवसांत लंगोट व किस्ताक शिवून ते पुन्हा त्याची चाचणी घेण्यासाठी सलमानला भेटले. शिवलेला लंगोट व किस्ताक सलमानला एकदम तंतोतंत बसले. माने यांचे कसब पाहून सलमानही खूश झाला.
या वेळी सलमानने त्यांच्याशी चक्क मराठीत संवाद साधला. मुलाबाळांची चौकशी केल्यावर माने यांची दोन्ही मुले कुस्ती खेळत असल्याचे समजल्याने त्याने आनंदही व्यक्त केला.
दिलेले काम योग्य रीतीने पार पाडल्याने १५ लंगोट व किस्ताक शिवण्याचे काम माने यांना देण्यात आले. या कामाबद्दल त्यांना १४ हजार रुपये देण्यात आले. केलेल्या कामाच्या मिळालेल्या मोबदल्यापेक्षाही आपण शिवलेल्या वेशभूषेत सलमानला पडद्यावर पाहातानाचे समाधान अधिक असल्याचे रुपचंद माने अभिमानाने सांगतात.
कसब पणाला
लंगोटाच्यावर घालण्यात येणाऱ्या किस्ताकला सर्वसाधारणपणे नाडी असते. पण सलमानला नाडी नको होती. त्यामुळे किस्ताकला नाडीऐवजी इलॅस्टिकचा पट्टा आतून मोठय़ा खुबीने शिवावा लागला. बाहेरून दिसताना किस्ताक इतर किस्ताकसारखेच दिसणे आवश्यक होते. त्यामुळे माने यांनी आपले कसब पणाला लावून नाडीवाल्या किस्ताकसारखेच हुबेहूब इलॅस्टिकचे किस्ताक तयार केले.