११ वर्षांपूर्वी मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अभिनेता सलमान खानवर नव्याने खटला चालविण्यासाठी सत्र न्यायालयाने बुधवार, २६ मार्चची तारीख निश्चित केली खरी; मात्र फेरसुनावणीच्या पहिल्याच दिवशी साक्षीदारांनी दांडी मारल्याने खटल्याचे कामकाज होऊ शकले नाही. अखेर न्यायालयाने खटल्याची सुनावणी १ एप्रिल रोजी ठेवली आहे.
नव्या आरोपानुसार आपल्याविरुद्ध नव्याने खटला चालविण्याची सलमानची मागणी मान्य करीत सत्र न्यायालयाने फेरखटल्याचे आदेश दिले होते. आधीच्या खटल्यात नोंदविण्यात आलेला साक्षीपुरावा फेरखटल्यात ग्राह्य धरला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानविरुद्धच्या फेरखटल्याला २६ मार्चपासून सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी खटल्याचे कामकाज सुरू झाले. ठरल्यानुसार, सरकारी पक्षातर्फे तीन औपचारिक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार होती. मात्र एकही साक्षीदार हजर झाला नाही. यातील एक साक्षीदार हा जेथे अपघात झाला, त्या पदपथासमोरील लॉण्ड्रीवाला होता, तर अन्य दोघे पंच साक्षीदार होते. लॉण्ड्रीवाल्याला पक्षाघात झाला आहे, तर एक पंच साक्षीदार सापडत नाही. दुसरा बंगळुरूमध्ये असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील जगन्नाथ केंजाळकर यांनी न्यायालयाला दिली.

Story img Loader