Salman Khan Bodyguard Shera on Bollywood Actor’s security : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याला आलेल्या धमक्यांमुळे अधिक चर्चेत आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या टोळीने सलमान खान याच्यासह मुंबईतील व्यावसायिक, बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार घडवून आणला होता. अशातच दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) मुंबईतील प्रमुख नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येची जबाबदारी स्वीकारताना टोळीतील एका सदस्याने अभिनेता सलमान खानचा उल्लेख केल्यामुळे मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष दिलं आहे.
दुसऱ्या बाजूला, सलमान खानने त्याच्या सुरक्षेसाठी वेगळी टीम सज्ज ठेवली आहे. शेरा उर्फ गुरमीत सिंह जॉली हा सलमान खानचा प्रमुख अंगरक्षक (बॉडीगार्ड) आहे. तसेच सलमानचं खासगी सुरक्षापथक त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. शेरा हा गेल्या २५ वर्षांपासून सलमानबरोबर राहतोय, त्याची सुरक्षा व्यवस्था पाहतोय. बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमक्यांमुळे सलमान खान भितीदायक वातावरणात आहे. अशातच सलमानचा बॉडीगार्ड शेरा याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये शेराने सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी टिप्पणी केली होती. यावेळी त्याने सांगितलं होतं की तो सलमानला पहिल्यांदा कसा भेटला? तो त्याची सुरक्षा व्यवस्था कशी पाहतो? सलमानची सुरक्षा व्यवस्था पाहताना कोणकोणत्या अडचणी येतात?
हे ही वाचा >> Video: ‘बिश्नोई गँग आणि भारतीय गुप्तहेर एकत्र काम करतात’, कॅनडा पोलिसांचा दावा; भारताच्या कडक भूमिकेनंतर जळफळाट
शेरा काय म्हणाला?
एएनआयशी बोलताना शेराने सांगितलं होतं की “सलमान खान माझा मालक आहे. सलमान प्रत्येकवेळी माझ्यासाठी उभा राहतो. सलमानची बहीण अर्पितामुळे माझी सलमानबरोबर पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर मी सोहेल खानला भेटलो होतो. त्यांच्या चंदीगडमधील एका कार्यक्रमात त्यांना काही अडचणी आल्या होत्या. त्यावेळी मी पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम केलं”.
धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्या आली : शेरा
शेरा म्हणाला, “सलमान खानची सुरक्षा व्यवस्था पाहताना सर्वात मोठं आव्हान असतं ते गर्दीचं, कारण लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याला भेटायचं असतं, त्याच्याबरोबर फोटो काढायचे असतात. पूर्वी त्याच्या जीवाला धोका नव्हता. त्यामुळे तेव्हा त्याची सुरक्षा व्यवस्था पाहणं अवघड नव्हतं. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी आम्हाला चोख बंदोबस्त करावा लागतो”.
हे ही वाचा >> लॉरेन्स बिष्णोई सलमान खानच्या मागे हात धुवून का लागलाय? वाचा २६ वर्षांचा घटनाक्रम
सलमानच्या सुरक्षेचे अनेक स्तर आहेत. शासकीय सुरक्षा पथक (पोलिसांचं पथक) आणि खासगी सुरक्षा पथक एकत्र मिळून काम करतात. सलमानच्या जीवाला धोका आहे. ज्या कलाकारांच्या जीवाला धोका असतो त्यांची सुरक्षा व्यवस्था पाहणं खूप कठीण असतं.