प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या ‘सलमान खान फिल्म्स’ (एसकेएफ) निर्मितीसंस्थेच्या ‘हिरो’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १९८३ साली प्रदर्शित झालेले दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’चे रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा आगमन होत आहे. मात्र, यावेळी या ‘हिरो’ला आधुनिक साज, दबंग खान सलमानची निर्मिती आणि नव्या चेहऱयांना संधी, असे वलय प्राप्त झाल्याने प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बुधवारी सलमानच्या हस्ते हिरो या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. रणबीर कपूर, सोनम कपूर, वरूण आणि आलिया यांच्यासारखीच आणखी दोन बॉलीवूडकरांची मुले मोठ्या निर्मितीसंस्थेमार्फत चंदेरी दुनियेत दमदार एण्ट्री घेणार आहेत. आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी हिरोच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहेत. ट्रेलरमधील काही क्षण १९८३ सालच्या ‘हीरो’ या मूळ चित्रपटाची आठवण करून देतात. खासकरून ट्रेलरच्या अखेरीस ‘प्यार करने वाले कभी डरते नही, जो डरते हे वो प्यार करते नही’ हे अथियाचे उद्गार चित्रपटाबाबतच्या रसिकांच्या अपेक्षा वाढवतात, तर सूरज पांचोलीचे अॅक्शन सिन्स उत्सुकता वाढवणारे आहेत. अॅक्शन, ड्रामा, प्यार आणि म्युझिक अशी सरमिसळ या ट्रेलरमधून पाहायला मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा