अभिनेता सलमान खानने बलात्कारित स्त्रियांसदर्भात केलेले ते वक्तव्य दुर्देवी आणि असंवेदनशील असल्याचे परखड मत आमिर खान याने व्यक्त केले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान खानचा मोठा दबदबा असल्यामुळे त्याच्याविरुद्ध भूमिका घेताना अनेकजण कचरतात. मात्र, आमिरने सोमवारी दंगलच्या पोस्टर प्रदर्शनावेळी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ठामपणे आपली भूमिका मांडली. यावेळी आमिर खानने म्हटले की, सलमानने हे वक्तव्य केले तेव्हा मी त्याठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित नव्हतो. मात्र, गेल्या काही दिवसांत मी ज्या बातम्या वाचल्या आहेत, निदान त्यावरून तरी सलमानचे वक्तव्य दुर्देवी आणि असंवेदनशील असल्याचे मला वाटते. मला याविषयी सलमानशी बोलायचे असल्याचेही आमिरने सांगितले. मात्र, तू सलमानला काय सल्ला देशील, असा प्रश्न विचारला असता, मी सलमानला सल्ला देणारा कोण आहे, असा प्रतिप्रश्न आमिरने उपस्थित केला.
सलमानच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शाहरुख म्हणाला.. 
सलमान खानने त्याच्या ‘सुलतान’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हे वक्तव्य केले होते. त्यावेळी तो चित्रपटातील त्याच्या अनुभवाविषयी सांगत होता. तेव्हा सलमान म्हणाला की, शूटींगच्या त्या सहा तासांमध्ये बरीच मेहनत घ्यावी लागत होती. जर एखादा पहेलवान मला उचलून जमिनीवर आदळतोय तर मलाही १२० किलो वजनाच्या पहेलवानाला उचलून आपटावे लागत होते. जवळपास दहा वेळा दहा विविध बाजूंनी एकाचा दृश्याचा अॅन्गल घेतला जाई. माझ्यासाठी हे फार कठीण काम होते. जेव्हा मी शूटींग आटपून रिंगणातून बाहेर यायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेप्रमाणे वाटायचे. गेल्या काही दिवसांत या वक्तव्याची देशभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने सलमानला हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले आहेत. अनेकजणांकडून सलमानवर टीकाही करण्यात आली आहे. मात्र, बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेकजण याबाबत सांभाळूनच बोलताना दिसत आहेत.
VIDEO: आता मी कमीच बोलायला हवे- सलमान खान