जिया खान आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या सुरज पांचोलीसाठी २०१३ साल अतिशय वाईट गेले असले तरी, २०१४ त्याच्यासाठी आशेचा किरण घेऊन आले आहे. सलमान खानने आपल्या ‘सलमान खान प्रॉडक्शनस’ची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला असून, आपल्या प्रॉडक्शन बॅनरखाली सुभाष घईंच्या ‘हिरो’ या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती तो करणार आहे. सलमानच्या या चित्रपटाद्वारे सुरज पांचोली बॉलिवूडमधील आपले पदार्पण करीत आहे. सलमानने चित्रपटासाठीच्या तारखा देखील निश्चित केल्या आहेत. या चित्रपटाशी निगडीत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘हिरो’ च्या रिमेकचे चित्रीकरण १८ फेब्रुवारीला सुरू होईल आणि चित्रपट १२ डिसेंबरला प्रदर्शित होईल. स्वत: सलमानने या तारखा निश्चित केल्या आहेत. ‘हिरो’च्या रिमेकसाठी सलमानने निखिल अडवाणीची निवड केली असून, निखिल कथेवर काम करीत आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहे. सुरज विषयी आदित्य पांचोली म्हणाला, माझ्या मुलाला यापेक्षा चांगला ‘ब्रेक’ मिळू शकला नसता. सलमान आणि त्याच्या सहकाऱ्यानी सुरजचा संपूर्ण ताबा घेतला आहे. झरिना आणि मी सुरजला पूर्णपणे त्यांच्या हवाली केला आहे. आदित्यच्या मते सुरज आणि आथिया शेट्टीची जोडी पडद्यावर चमत्कार घडवेल. आथिया विषयी आदित्य म्हणाला, सुनिल आणि त्याच्या परिवाराला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मला ते कुटुंबासारखे आहेत. आथिया मला माझ्या मुलीसारखी आहे. सुरज आणि आथिया कठोर मेहनत घेत एकत्रितपणे अभिनयाचे धडे गिरवत आहेत. त्या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसते. ते मोठ्या पडद्यावर चमत्कार घडवतील याची मी तुम्हाला खात्री देतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा