रमजानच्या पवित्र वातावरणात शाहरूख आणि सलमान यांनी एकमेकांना आलिंगन देऊन काही वर्ष सुरू असलेल्या शत्रुत्वाचा अध्याय संपवला. त्यावर हे भांडण मिटल्याबद्दल शाहरूखने आपला आनंद जाहीर केला होता. सलमान मात्र त्यानंतर गप्पच होता. पण, ‘बिग बॉस’साठी माध्यमांना सामोरे गेलेल्या सलमानला पुन्हा एकदा शाहरूखबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ‘बिग बॉस’च्या सेटवर शाहरूखलाही आमंत्रण द्यायची आपली तयारी असल्याचे सलमानने सांगितले. शाहरूखला जर आपल्या आगामी चित्रपटाची प्रसिध्दी या शोमध्ये करायची असेल तर आणखीनच चांगली गोष्ट आहे, असे सांगत सलमाननेही गळाभेट अगदीच व्यर्थ गेली नाही याचा दिलासा दिला आहे. म्हणजे दोन खानांमध्ये मैत्री आहे की नाही हा पुढचा प्रश्न झाला; पण, वैरही नाही हे स्पष्ट करण्याची संधी सलमाननेही घेतली. ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची घोषणा करताना यंदाचा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी स्वर्गीय आनंद तर स्पर्धकांसाठी नरकाची सफर घडवणारा असेल, अशी खात्री सलमानने दिली आहे. कलर्स वाहिनीच्या ‘प्राइम टाइम’मधला हा महत्त्वाचा शो त्याच्या दरवर्षी बदलत जाणाऱ्या स्वरूपामुळे आणि अर्थात सलमानमुळे आजपर्यंत आपली लोकप्रियता टिकवून असल्याचे मत कलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज नायक यांनी व्यक्त केले. यावर्षी सलमान ‘बिग बॉस’च्या घरात दोन अवतारात बॉसगिरी करताना दिसणार आहे. एक देवदूत आणि दुसरा सैतान अशा दोन्ही भूमिकांमधल्या सलमानमध्ये वरचढ कोण ठरणार?, यावर ते स्पर्धक आठवडाभर घरात काय -काय उद्योग करतील त्यांच्यावर अवलंबून असल्याचे सलमानने स्पष्ट केले आहे. या पर्वात १४ स्पर्धक १०४ दिवसांसाठी लोणावळ्यात अगदी भर बाजारपेठेत असलेल्या एका घरात राहणार आहेत. या शोच्या स्पर्धकांची नावे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
देव आणि दानव बनून स्पर्धकांच्या चांगल्या-वाईटाची परीक्षा घेणाऱ्या सलमानमध्ये चांगले गुण किती आहेत आणि दोष किती आहेत?, असे विचारताच या दोन्ही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वात अगदीच थोडय़ा प्रमाणात असल्याबद्दल सलमानने खंत व्यक्त केली. वाईट म्हणजे मी फारतर खोडकर आहे, दुष्ट अजिबात नाही पण, चांगले गुणही अगदीच कमी असल्याने वाईट वाटते असे सलमानने सांगितले. शाहरूखबरोबर यापुढे स्पर्धा करायचीच असेल तर ती आपल्या चित्रपटातील कामाने करू..आणि शाहरूखच कशाला? आमिरचाही चित्रपट येतोय आणि रणबीरबरोबरही स्पर्धा करावी लागणार आहे, असे सांगणाऱ्या सलमानने आपण सध्या फारच वेगळा विचार करत असल्याचे दाखवून दिले आहे.
‘बिग बॉस’च्या सेटवर सलमानचे शाहरूखला आवतण
रमजानच्या पवित्र वातावरणात शाहरूख आणि सलमान यांनी एकमेकांना आलिंगन देऊन काही वर्ष सुरू असलेल्या शत्रुत्वाचा अध्याय संपवला. त्यावर हे भांडण मिटल्याबद्दल शाहरूखने आपला आनंद जाहीर केला होता.

First published on: 13-09-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan shahrukh khan is welcome on bigg boss