५ ऑगस्ट १९९४ ला प्रदर्शित झालेला सुरज बडजात्यांचा कौटुंबिक प्रेमकहाणीवर आधारित संगीतप्रधान चित्रपट ‘हम आपके है कौन’ ला आज २० वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित या हिट जोडीबरोबर मोहनीश बहल, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू आणि अलोकनाथ इत्यादींच्या भूमिका होत्या. कौटुंबिक प्रेमकहाणी असलेल्या या संगीतप्रधान चित्रपटाने अभूतपूर्व यश अनुभवले. माधुरी दीक्षितने साकारलेली निशा आणि सलमानचा प्रेम प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या संगीतप्रधान चित्रपटात तब्बल १४ गाणी होती. चित्रपटातील सुमधुर गाण्यांनी संगीतप्रेमीच्या मनाचा ठाव घेतला. आज ही या चित्रपटातील गाणी तितक्याच आवडीने ऐकली जातात. एक अब्जापेक्षा जास्त धंदा करणारा हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाने पाच फिल्मफेअर पुरस्कारांबरोबर ‘बेस्ट पॉप्युलर फिल्म फॉर प्रोव्हायडिंग होलसम एन्टरटेन्मेंट’साठीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटकावला.
‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि बडजात्यांनी ‘हम आपके है कौन’ चित्रपटाचे यश आणि २०वा वर्षाचा कालावधी साजरा केला. सध्या हे दोघे कर्जत येथे या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. सलमान आणि बडजात्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाद्वारे १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात त्यांनी शेवटचे एकत्र काम केले होते. या चित्रपटात सैफ अली खान, करिष्मा कपूर, तब्बू आणि सोनाली बेन्द्रे इत्यादींच्या प्रमुख भूमिका होत्या.
‘हम आपके है कोन’ या सदाबहार चित्रपटाविषयीच्या भावना दिग्दर्शक करण जोहर आणि चित्रपटाशी संबंधितांनी टि्वटरवर पोस्ट केल्या आहेत.

 

 

Story img Loader