‘सलमानभाई का दिल सोना है..’ हे बॉलिवूडला माहिती आहे तसा त्याचा जगभरातही बोलबोला असावा बहुधा. अडचणीत किंवा वादात सापडणाऱ्यांना मदत करणे हे जणू त्याचे कर्तव्यच बनले आहे. त्याच्या याच ‘बीइंग ह्य़ुमन’ तत्त्वामुळे अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला, विशेषत: तरूणींना मदत करणाऱ्यांच्या यादीत त्याचा अगदी पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे जर त्याने एखाद्या तरूणीला मदत केली ‘भाईला पोरगी पटली रे पटली’चा धोशा सुरू होतो. कालांतराने तीच तरूणी ‘सलमान मेरा भाई है’ म्हणत दुसऱ्या वाटेने पसार होते. आताही सलमानच्या आयुष्यात काय त्याच्या घरातच रहायला आलेली ल्युलिया वांटुर या रोमानियन मॉडेलबरोबर त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे आणि तिच्याशी तो लग्न करणारच, या बातम्यांनी खळबळ उडवून दिली होती. पण, त्याच्या आयुष्यात आलेली ही नवी तरूणी आधीच विवाहित असल्याचे कळल्यानंतर सलमानचे हेही प्रेमप्रकरण ‘बीइंग ह्य़ुमन’ प्रकरणाचा आणखी एक भाग असल्याचेच दिसते आहे.सलमानचे एका रोमानियन मॉडेलशी प्रेमप्रकरण असल्याच्या उडत्या बातम्या माध्यमांमधून कधीपासून चघळल्या जात होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी सलमानचे हृदय जिंकणारी ही तथाकथित प्रेयसी वांद्रय़ातील त्याच्या घरी दिसू लागली. तिकडे ‘मेंटल’चे चित्रीकरण हैदराबादमध्ये होणार म्हटल्यावर सलमानने तिला तिकडेही नेले, तेही खुल्लमखुल्ला. त्यामुळे आता सलमान आपल्या प्रेमाबद्दल गंभीर झाला असावा, असाच सगळ्यांचा समज झाला. सध्या तो ल्युलियासाठी वांद्रय़ातच कार्टर रोडवर घर शोधत आहे. या सगळ्याचा काय अर्थ असू शकतो? तरीही ही रोमानियन तरूणी कोण आणि अख्खं जग सोडून मुंबईत आली तरी कशाला?, या सगळ्याचा शोध सुरू झाला आणि त्यातून आणखी धक्कादायक माहिती बाहेर आली. ल्युलिया वांटुर ही रोमानियन संगीतकाराशी विवाहबध्द झाली होती. ते दोघेही सतत भांडतात, पुन्हा एकत्र येतात. त्यांच्या प्रेमप्रकरणांच्या बातम्यांनी तिथल्या वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेले असतात. अगदी गेल्या वर्षीही त्यांच्या चुंबनदृश्याने खळबळ उडवून दिली होती. एवढी सगळी माहिती कळल्यावर सलमानच्या चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. याआधी सलमानने कतरिनालाही अशीच भरभरून मदत केली होती. घर घेण्यापासून बॉलिवूडमध्ये करिअर सेट करण्यापर्यंत सगळे त्यानेच केले होते. त्याची परिणती काही त्यांच्या लग्नात झाली नव्हती. आताही तो जॅकलीन फर्नाडिस या श्रीलंकन अभिनेत्रीची साजिद खानच्या किनाऱ्यावरून सुटलेली नौका बॉलिवूडच्या बंदरावर आणू पाहत आहे. तसेच हेही रोमानियन वांटुर प्रकरण असावे बहुधा..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा