बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सलमानचा वाढदिवस झाला. मात्र त्याच्या एकच दिवस अगोदर त्याला सर्पदंश झाल्याचं समोर आलं होतं. अर्थात सलमान यातून वाचला. पण ही पहिलीच वेळ नाही जेव्हा सलमान कोणत्या मोठ्या संकटातून वाचला आहे. हे कशामुळे होतं. कोणाचे आशीर्वाद आहेत? माहीत नाही पण, सलमान खानची एक गोष्ट नेहमीच त्याच्यासोबत असते. ती म्हणजे त्याच्या हातात असलेलं ब्रेसलेट.
चित्रपट असो किंवा आणखी काही सलमान त्याचं हे ब्रेसलेट कधीच हातातून काढत नाही. सलमाननं एका मुलाखतीत या ब्रेसलेटबाबत भाष्य केलं होतं. तसेच हे ब्रेसलेट त्याच्यासाठी का एवढं खास आहे हे सांगितलं होतं. तो म्हणाला होता, ‘माझे बाबा पूर्वी अशाप्रकारचं ब्रेसलेट वापरत असत. त्यावेळी मी त्यांच्या ब्रेसलेटसोबत खेळत असे. जेव्हा मी मोठा झालो, काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना तसंच एक ब्रेसलेट मला दिलं. यामध्ये असलेल्या खड्याला फिरोजा असं म्हटलं जातं.’
सलमाननं या मुलाखतीत या ब्रेसलेटच्या खड्याबद्दलही सांगितलं होतं. तो म्हणाला, ‘हा एक विशिष्ट प्रकारचा दुर्मिळ दगड आहे. जेव्हा तुमच्याकडे कोणत्याही नकारात्मक शक्ती येतात. तेव्हा हा दगड त्या स्वतःकडे खेचून घेतो. त्याच्या वाकड्या रेषा तयार होतात आणि मग त्याला तडा जातो. सध्या माझ्या हातात असलेला हा सातवा खडा आहे.’
दरम्यान सलमान खानसाठी हे ब्रेसलेट खूप महत्त्वाचं आहे. ज्याचा एक किस्सा त्यानं शेअर केला होता. काही वर्षांपूर्वी सलमान त्याच्या मित्रांसोबत पनवेल फार्महाऊसवर पार्टी करत होता. त्यावेळी मस्ती- धम्माल करता करता ते ब्रेसलेट कुठेतरी हरवलं आणि सलमानचा मूड खराब झाला. त्यानंतर त्यानं मित्रांसोबत ते ब्रेसलेट शोधायला सुरुवात केली. त्यानंतर अश्मित पटेलला ते स्विमिंग पूलमध्ये पडलेलं सापडलं. अखेर ब्रेसलेट सापडल्यानंतर सलमानच्या चेहऱ्यावर हसू आलं.