अभिनेता सलमान खानच्या चित्रपट कारकीर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. सलमानच्या आजवरच्या सर्व चित्रपटांपैकी ‘तेरे नाम’ या चित्रपटामध्ये त्याने सादर केलेल्या अभिनयाला अनेकांनी दाद दिली. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये ‘तेरे नाम’ या चित्रपटाला तब्बल २४ नामांकनं मिळाली असून, या चित्रपटाने सात पुरस्कार पटकावले होते. आता याच चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’चं दिग्दर्शन सतीश कौशकने केलं असून आगामी सीक्वलचं दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत. त्यामुळे १६ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम २’ची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. मात्र सध्या ते पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका असलेल्या कागज चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर ते ‘तेरे नाम २’च्या चित्रीकरणाकडे वळणार आहे. विशेष म्हणजे सतीश कौशिक यांनी या वृत्तालाही दुजोरा दिला आहे. “सध्या या चित्रपटावर मी काम करत आहे, त्यामुळे या चित्रपटाविषयी अधिक काही सांगता येणार नाही”, असं सतीश यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांनी या सीक्वलसाठी सलमान खानशी संपर्क साधला होता. मात्र सलमानने या चित्रपटाला नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. सलमानच्या नकारानंतर सतीश कौशिक दोन नव्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट करणार आहेत. मात्र सलमान या चित्रपटामध्ये कॅमिओ रोलमध्ये दिसू शकतो अशी चर्चा होत आहे.