हिट अँड रन प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आता बॉलीवूड अभिनेता सलमान खान लवकरच ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काश्मीरला रवाना होण्याची शक्यता आहे. हिट अँड रन प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. त्यामुळे या काळात लवकरात लवकर ‘बजरंगी भाईजान’चे चित्रीकरण पूर्ण करण्याचा सलमानचा प्रयत्न आहे.
येत्या जुलै महिन्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे गेले काही दिवस काश्मीरमध्ये ‘बजरंगी भाईजान’चे चित्रीकरण सुरू होते. मात्र, हिट अँड रन खटल्याच्या सुनावणीसाठी ६ मे रोजी सलमानला चित्रीकरण सोडून मुंबईत परतावे लागले होते. मात्र, आता सलमान येत्या एक-दोन दिवसांतच काश्मीरला परतून चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे चित्रीकरण आटोपल्यानंतर सलमान लगेचच सुरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’च्या चित्रीकरणासाठी मुंबईत परतणार आहे. याशिवाय, जुलै महिन्यात आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली आणि सुनील शेट्टीची कन्या अथिया यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरो’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमातही सलमान सहभागी होणार आहे. सलमान खानला सत्र न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविल्यानंतर बॉलीवूडला २५० कोटींचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने निर्माते आणि दिग्दर्शक लवकरात लवकर चित्रपट आटोपण्याच्या तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा