बॉलीवूडचा आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट सलमान खानसाठी अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने सलमान आणि सुरज बडजात्या यांनी तब्बल १५ वर्षांनी पुन्हा एकत्रित काम केले. यानिमित्ताने त्यांच्यातील जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. त्यामुळेच सलमानने राजश्री बॅनरच्या चित्रपटात सहकलाकार असलेल्या माधुरी दीक्षित आणि भाग्यश्री यांच्यासाठी ‘प्रेम रतन धन पायो’चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्याचे ठरवले आहे. सलमान खानने १९८९ मध्ये भाग्यश्रीसोबत ‘मैने प्यार किया’ आणि १९९४ मध्ये माधुरीबरोबर ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय, या दोन्ही चित्रपटांप्रमाणेच ‘प्रेम रतन धन पायो’मध्येही सलमानच्या व्यक्तिरेखेचे नाव प्रेम आहे. ही व्यक्तिरेखा पूर्वीच्या दोन्ही चित्रपटांत प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यामुळेच प्रेमने आपल्या जुन्या नायिकांसाठी ‘प्रेम रतन धन पायो’चे स्क्रिनिंग आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या स्क्रिनिंगची तारीख अजूनही निश्चित झालेली नसली तरी या स्क्रिनिंगसाठी सलमान माधुरी आणि भाग्यश्री यांना खास आमंत्रण देणार आहे. माधुरी आणि भाग्यश्री या दोघींनीही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात सलमानबरोबर काम केल्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव विशेष असेल, असे ‘प्रेम रतन धन पायो’च्या टीमकडून सांगण्यात आले. येत्या १२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
salmankhanpremratandhanpayo2

Story img Loader