गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सामान्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांनी आपला सहभाग नोंदविला. राष्ट्रीय पातळीवरील या उपक्रमात खुद्द पंतप्रधानांकडून निवड करण्यात आलेला अभिनेता सलमान खानने याआधीदेखील भाग घेतला असून, तो खूप मोठ्या प्रमाणावर या कार्यात योगदान देत आहे. ‘स्वच्छ भारत’साठी सलमान घेत असलेली मेहनत पंतप्रधानांच्या नजरेतून सुटलेली नाही. सलमान खानच्या योगदानाचे कौतुक करणारा संदेश पंतप्रधानांनी टि्वट केला आहे.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सह-कलाकार करीना कपूर आणि चित्रीकरणस्थळी उपस्थित असलेल्या इतर सर्वांसह सलमानने हातलुनी गावाची रंगरंगोटी केली. रंगाऱ्यांच्या मदतीने सलमान आणि इतर सर्वांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवत गावातील प्रत्येक घराची रंगरंगोटी केली. याआधी कर्जतमध्येदेखील सलमानने स्वच्छता अभियान राबवले होते. स्वच्छता अभियानाचा हा उपक्रम चालू ठेवण्याचा त्याचा मानस असून, दर महिन्याला शंभर जणांना या अभियानात सहभागी करून घ्यायचे त्याने ठरवले आहे. तसा संदेशदेखील त्याने फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे. सलमानकडून नामांकित करण्यात आलेल्या व्यक्तीने स्वच्छतेपूर्वीची आणि नंतरची छायाचित्रे अथवा व्हिडिओ पोस्ट करण्याचे आवाहन सलमान खानने फेसबुकवर केले आहे. पाच सर्वोत्कृष्ट स्वच्छ परिसरांची विशेष नोंद सलमान खानच्या फेसबुक पेजवर करण्यात येऊन प्रत्येकाला पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सलमानद्वारे जाहीर करण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत’ अभियानातील योगदानासाठीच्या नामांकनाची पहिली शंभर जणांची यादी उद्या प्रसिद्ध होणार आहे.

Story img Loader