एकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र असलेले सलमान खान आणि शाहरूख खान यांच्या मैत्रीमध्ये अंतर पडले आणि बॉलिवूडचे हे दोन्ही सुपरस्टार एकमेकांपासून दूरावले. गेल्या अनेक वर्षापासूनचे हे वैर संपुष्टात आले असून, दोघांनी आपल्यातील हेवेदावे बाजूला सारत एकमेकांमधील मैत्रिपूर्ण संबंध पूर्ववत केले आहेत. त्यांची ही दोस्ती इतकी जमून आली आहे की, सलमान खानने ‘प्रेम रतन धन पायो’ या आपल्या आगामी चित्रपटाची प्रसिद्धी शाहरूख खानच्या पावलावर पाऊल ठेवत करण्याचे ठरविले आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘हॅपी न्यू इयर’ हा शाहरूखचा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला होता. ‘स्लॅम’ ‘वर्ल्ड टूर’सारख्या कल्पक योजना राबवीत शाहरूख खानने चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी केली होती. शाहरूख खानप्रमाणेच ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘वर्ल्ड टूर’ अथवा त्याच धर्तीवर प्रसिद्धी कार्यक्रम राबविण्याचा सलमान विचार करीत आहे. आता सलमानलादेखील आपल्या जगभरातील चाहत्यांना प्रसिद्धी कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचे आहे. यासाठी तो विविध देशांत जाऊन ‘प्रेम धन रतन पायो’ चित्रपटाची प्रसिद्धी करणार असल्याचे समजते. हे सर्व पाहता या मैत्रीतून सलमानला फायदा होत असल्याचे जाणवते. या चित्रपटाने जगभरात चांगले यश संपादन केल्यास सलमानसाठी ही आनंदाची बाब ठरेल. सलमानचे देशभरात मोठ्याप्रमाणावर चाहते असले, तरी जगभरातील त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाल्यास त्याचे चित्रपट फार मोठी कामगिरी करू शकतात. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाद्वारे सलमान खान जवळजवळ चौदा वर्षांनंतर राजश्रीबरोबर काम करीत आहे. सुरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात सलमानबरोबर सोनम कपूर दिसणार असून, नील नितीन मुकेश आणि स्वरा भास्कर यांच्यादेखील भूमिका आहेत. पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा