सलमान खान, करण जोहर, रणबीर कपूर आणि हरभजन सिंगसारखे अनेक सेलिब्रिटी एक दिवसासाठी सामान्य माणसाचे जिणे जगताना दृष्टीस पडणार आहेत. टिव्हीवरील ‘मिशन सपने’ या आगामी कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी केशकर्तनकार, फोटोग्राफर आणि टॅक्सी ड्रायव्हरसारख्या सामान्य माणसाच्या जीवनाचा अनुभव घेत, त्याचा रोजंदारीचा व्यवसाय करून त्याच्यासाठी उत्पन्न कमवताना दिसणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटींना एकत्र आणून सामान्य माणसाच्या फायद्यासाठी त्यांच्या प्रसिद्धीचा उपयोग करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना त्यांचे आवडत्या कलाकाराला सुखवस्तू जीवनातून बाहेर पडत टॅक्सी चालविणे, भाजी विकणे किंवा दोरोदारी जाऊन वस्तू विकणे अशी कामे करताना दिसणार आहेत. सामान्य आणि खडतर जिवन जगत असलेल्या माणसाच्या जिवनात या सेलिब्रिटींची हुशारी, विनोदीबुद्धी आणि स्टारडमशिप नक्कीच एक बदल आणताना दिसेल. या शोच्या पहिल्या सत्रात बॉलिवूड, टीव्ही, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातील सेलिब्रिटी दिसणार आहेत. सुपरस्टार सलमान खान एक दिवसासाठी केशकर्तनकार झाला आहे, तर करण जोहर फोटोग्राफर, रणबीर कपूर वडा-पाव विक्रेता, सिद्धार्थ मल्होत्रा भाजीविक्रेता, हरभजन सिंग खारी-विक्रेता तर मिक्का सिंग चहा विकताना दिसणार आहेत. प्रसिद्ध टीव्ही कलाकार रोनित रॉय, राम कपूर आणि द्रष्टी धामी अनुक्रमे सौंदर्यप्रसाधने विकताना, टॅक्सी चालवताना आणि लिंबू-मिरची विकताना दिसणार आहेत. सोनाली बेंद्रे सुत्रसंचालक असलेला हा कार्यक्रम २७ एप्रिलपासून रात्री ८ वाजता कलर्स वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे.

Story img Loader