भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील नात्याविषयी भाष्य करणारा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांनी पहावा, अशी इच्छा अभिनेता सलमान खानने ट्विटरवरून व्यक्त केली आहे. मी प्रेम आणि आदरपूर्वक भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी हा चित्रपट पहावा अशी इच्छा व्यक्त करतो. कारण, लहान मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची भावना कोणत्याही देशाच्या सीमा मानणारी नसते, असे सलमानने या ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, सलमानने पाकिस्तानात चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्याबद्दल पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाचे आभारही मानले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारत-पाक संबंधांमध्ये मोठ्याप्रमाणावर कटुता आली होती. त्यामुळे दोन्ही देशांचे पंतप्रधान काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात एक हिंदू तरूण आणि पाकिस्तानातील लहान मुलीची गोष्ट सांगण्यात आली आहे. हा हिंदू तरूण या लहान मुलीला तिच्या मायदेशी म्हणजे पाकिस्तानात सोडायला जातो, त्या प्रवासाचे चित्रण ‘बजरंगी भाईजान’मध्ये करण्यात आले आहे.

Story img Loader