आतापर्यंत पडद्याआड राहून ‘बिग बॉस’च्या घरातली सूत्रं सांभाळणाऱ्या सलमान खानने आगामी सातव्या पर्वामध्ये थेट स्पर्धकोंबरोबरच राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पर्वात सलमान म्हणजे बिग बॉस स्वत:च दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. एक आहे ‘एंजल’ अर्थात देवदूत आणि दुसरा आहे नरकात घेऊन जाणारा ‘सैतान’. दोन्ही भूमिकेत तो बॉस आहे आणि कुठल्या स्पर्धकाला स्वर्गात म्हणजे आनंदीआनंद असणाऱ्या विश्वात न्यायचे तर क ोणाला जिवंतपणी नरक दाखवायचा हा निर्णय ‘बिग बॉस’ घेणार आहे आणि कितीही ‘बीईंग ह्युमन’ची पाटी लावून फिरत असला तरी खोडसाळ सलमानसाठी देवदूतापेक्षाही सैतानाची भूमिका आवडती आहे. त्याची एक छोटी झलक बिग बॉसच्या प्रमोशनसाठी छायाचित्रण करणाऱ्या सलमानने स्पर्धकांबरोबर घरात राहण्याची इच्छा जाहीर करून दाखवून दिली आहे.
‘बिग बॉस’च्या दोन्ही अवतारात छायाचित्र काढून घेत असताना धम्माल मस्तीच्या मुडमध्ये असलेल्या सलमानने ‘मलासुध्दा या स्पर्धकांबरोबर त्यांच्या घरातच राहू द्या रे..’, अशी सुरूवात केली. पाठोपाठ मी जर बिग बॉसच्या घरात गेलो ना तर पक्का त्यांचे आयुष्य नरक बनवून टाकेन..असंही त्याने अगदी खात्रीपूर्वक सांगितले आहे. सलमानला अशी संधी दिली तर तो खरोखरच स्पर्धकांची वाट लावेल, याची ‘बिग बॉस’ निर्मात्यांनाही खात्री आहे. त्यामुळे ते तसे अजिबात करणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे. पण, यावर्षीची देवदूत आणि सैतानाची कल्पना सलमानला या स्पर्धकांबरोबर खेळण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. त्याच्या या डबल डोसचा धसका घेतल्याने असेल पण, अजून स्पर्धकांची नावे निश्चित होत नाही आहेत. सलमान मात्र खूष आहे कारण या दुहेरी अवतारासाठी त्याला गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट मानधन मिळणार आहे.गेल्यावर्षी ‘बिग बॉस’च्या प्रत्येक भागासाठी त्याने २.५ कोटी रूपये मानधन घेतले होते. यावर्षी तो प्रत्येक भागासाठी ५ कोटी रूपये मानधन घेणार आहे. शिवाय, तो दरदिवशी दोन भागांचे चित्रिकरण करणार आहे कारण, ‘हिट अ‍ॅंड रन’ प्रकरणी त्याची सुनावणी १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचा निकाल लागण्याआधी ‘बिग बॉस’ संपवून त्याला मोकळे व्हायचे आहे. प्रत्यक्षात वाईट अनुभवातून जाणारा सलमान चित्रिकरणादरम्यान ‘बिग बॉस’च्या घरातील त्या स्पर्धकांचे काय करणार देव जाणे.. की सैतान जाणे..

Story img Loader