बॉलिवूडच्या चित्रपटांना चिनी प्रेक्षकांकडून भरभरून मिळणारा प्रतिसाद पाहता आता भाईजान सलमान खान याचादेखील चित्रपट येत्या काही दिवसांत चीनच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाला चीनमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. आता आणखी एक बॉलिवूड चित्रपट चीनमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत सलमानचा ब्लॉकब्लस्टर ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट मार्च महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे.

आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’, ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ हे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले आणि या चारही चित्रपटांना चिनी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. आता अमिरपाठोपाठ सलमानलाही चिनी चित्रपटगृहाचे दार खुले झाले आहेत. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला आणि सुपरहिट ठरलेला सलमानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. २ मार्चला चीनमधल्या ८ हजारांहून अधिक चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता. कबिर खान दिग्दर्शित या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती.

एकीकडे आमिर खान हा चिनी प्रेक्षकांचा सर्वात लाडका बॉलिवूड अभिनेता ठरला आहे. त्याच्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या दोन्ही चित्रपटांनी चीनमध्ये १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे आमिरसारखंच सलमान खानवरदेखील चिनी प्रेक्षक भरभरून प्रेम करतील का हे पाहण्यासारखं ठरेल.

Story img Loader