राजस्थान उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानची काळवीट शिकारी प्रकरणी निर्दोष मुक्तता केल्यामुळे सोशल मीडियावर आता या निर्णयाचे संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटांची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
अनेक वर्षे न्यायालयातच रेंगाळलेल्या या खटल्याचा निकाल अखेर सलमान खानच्या पारड्यात पडल्यामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. सलमान खानच्या बाजूने लागलेल्या या निकालाने चित्रपट वर्तुळात आणि त्याच्या चाहत्यांत आनंदाचे वातावरण असले तरीही अनेकजणांकडून या निर्णयावर आणि एकूणच न्यायसंस्थेवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. सलमानच्या हातून झालेली चूक पाहता त्याला याबद्दल अपेक्षित शिक्षा व्हायला हवी होती अशी मागणी आता अनेकजणांकडून सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून केली जात आहे. सदर प्रकरणाच्या निकालाची घोषणा होताच ट्विटरवरही हॅशटॅगची जोड मिळत सलमान खान क्षणार्धातच बऱ्या – वाईट प्रतिक्रियांचा सामना करत ट्रेंडिंगच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला आहे.

Story img Loader