सलमान खानबरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येक बॉलीवूड अभिनेत्रीच्या मनात असते. त्यात जर सलमाननेच एखाद्या अभिनेत्रीला हिंदी चित्रपटात पदार्पणाची संधी मिळवून दिली असेल तर त्याच्याबरोबर पुन्हा काम करणे ही कधी सुवर्णसंधी म्हणून समोर येते तर कधी नुसताच डोक्याला ताप होऊन बसतो. असाच एक अनुभव सध्या ‘दबंग’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या वाटय़ाला आला आहे. असे म्हटले जाते की सूरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ची नायिका सोनाक्षी होती. मात्र, सलमानमुळे हा चित्रपट सोनमच्या पदरात पडला.
सोनाक्षीने सलमानबरोबर ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ अशा दोन्ही चित्रपटांतून काम केले आहे. मात्र, ‘दबंग’ मालिका वगळता सलमानने इतर कोणत्याही चित्रपटासाठी सोनाक्षीचा नायिका म्हणून विचार केला नव्हता. ‘जय हो’साठी डेझी शाह आणि ‘किक’साठी जॅकलिन असे वेगवेगळे पर्याय त्याने शोधले. खरेतर, सलमानचे हे दोन्ही महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने ज्या सोनाक्षीने त्याला नायिका म्हणून ‘दबंग’ साथ दिली तिला तो एकातरी चित्रपटासाठी प्राधान्य देईल, अशी अटकळ होती. मात्र, त्याने तसे केले नाही. आणि तरीही सूरज बडजात्यांनी आपल्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’साठी प्रेमची नायिका म्हणून सोनाक्षीची निवड केली होती.  बडजात्यांचे आजवरचे चित्रपट पाहता ‘प्रेम रतन धन पायो’साठीही त्यांना नायिका सोज्वळ आणि भारतीय चेहऱ्याचीच हवी होती. त्यामुळे सोनाक्षी सिन्हा हा त्यांचा सहज पर्याय होता. पण, सलमानने सोनाक्षीला या चित्रपटाची नायिका करू नका, असे सांगितले. सोनाक्षी आणि आपण एकत्र आलो तर चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होईल. आम्ही दोघांनीही याआधीच दोन चित्रपटांमधून काम केले आहे. त्यामुळे यावेळी चित्रपटात नायिका म्हणून वेगळा चेहरा असावा, अशी सूचना सलमानने केली. म्हणून मग सोनाक्षीला सोडून दीपिका पदुकोणचा विचार करण्यात येत होता. दीपिका आणि सलमानने एकत्र काम केलेले नाही त्यामुळे ही फ्रेश जोडी होऊ शकली असती. पण, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या दोन चित्रपटांमध्ये दीपिकाने भन्साळींच्या बाजीरावची निवड केली आणि ‘प्रेम’ पुन्हा एकटा पडला. त्यानंतर हा चित्रपट सोनम कपूरच्या पदरात पडला. आता ही जोडी ‘प्रेम रतन धन पायो’च्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एकत्र येणार आहे. पण, सलमानच्या या नायिका हट्टामुळे सोनाक्षीला मात्र बडजात्यांची नायिका होण्याची संधी गमवावी लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा