भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बॉलीवूडकडून ‘बॉम्बे टॉकीज’ हा विशेष चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे, अशी चांगल्या अर्थाने बोंबाबोब केली गेली. ‘बॉम्बे टॉकीज’ हा भारतीय चित्रपटसृष्टीला सलामी या अर्थाने चित्रपट आहे, त्यामुळे त्याची जबाबदारीही आघाडीच्या चार तरुण दिग्दर्शकांकडे देण्यात आली. करण जोहर, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिवाकर बॅनर्जी या चौघांनीही खास चार कथा निवडल्या आणि त्याच्यावर आपापल्या शैलीत चार लघुपट केले. आणि आता हे चार लघुपट ‘बॉम्बे टॉकीज’ या नावाने ३ मे २०१३ रोजी प्रदर्शित होणार आहेत. ही शंभर वर्षांची वाटचाल बॉलीवूड नावाने लौकिक कमावलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीची आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना काही तरी खास कार्यक्रम करणे ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच ‘बॉम्बे टॉकीज’सारखा चित्रपट प्रदर्शित केला जातो आहे, असा गाजावाजा इंडस्ट्रीकडून होत असला तरी हा सगळा व्यावसायिक मामला असल्याचे अनुराग कश्यपने मान्य केले आहे.
‘बॉम्बे टॉकीज’च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत अनुरागने आपल्यापैकी प्रत्येकाला लघुपट दिग्दर्शित करण्यासाठी दीड कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर या लघुपटांच्या निमित्ताने आमच्या चौघांमध्येही चांगला दिग्दर्शक कोण, याची एक छुपी स्पर्धा सुरू असल्याची कबुलीही अनुरागने दिली आहे. ‘बॉम्बे टॉकीज’ची निर्मिती व्हायकॉम १८ आणि आशी दुवा यांनी केली आहे. त्यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी या चौघांची निवड केली आणि त्यासाठी मानधनही ठरवून दिले. त्यातही झोया, दिवाकर आणि अनुराग यांची चित्रपट दिग्दर्शनाची शैली ही काहीशी वास्तव कथांना आधार देणारी आहे तर करण जोहर पूर्णत: श्रीमंती वातावरणात रमणारा असल्याने आम्हा चौघांमध्ये करण बसणार नाही असे आपल्याला वाटत होते याची कबुली अनुरागने दिली. मात्र, हळूहळू करणशी माझा संवाद वाढला आणि तो ज्या पद्धतीने नव्या विचारांशी जुळवून घेत, नव्या दिग्दर्शकांना-कलाकारांना संधी देत पुढे जातो आहे हे पाहून त्याच्याबद्दलचा माझा गैरसमज दूर झाल्याचेही त्याने सांगितले.
 आम्हाला प्रत्येकाला दिग्दर्शनासाठी दीड कोटी रुपये देण्यात आले. माझ्यासाठी दीड कोटी रुपये म्हणजे खर्चाच्या सगळ्या गोष्टी धरूनही जमा जास्तच उरल्यासारखी आहे पण, करणसारख्या दिग्दर्शकाला दीड कोटी रुपयांत लघुपट बसवणे कठीण जाईल, असे मला वाटत होते. प्रत्यक्षात करण, दिवाकर आणि झोया सगळ्यांचेच लघुपट हे चांगले, नेहमीपेक्षा वेगळे झाले आहेत, असे अनुरागने सांगितले. एकंदरीतच अनुरागच्या या वक्तव्यावरून ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये या चौघांचीही भावनिक गुंतवणूक असण्यापेक्षा व्यावसायिकच गुंतवणूक जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader