‘व्यभिचाराला पाप म्हणण्याच्या मुळाशी अशी समजूत आहे, की स्त्री-पुरुष संबंध ही एक अपवित्र, घाणेरडी गोष्ट आहे व सामान्यत: ते पापच आहे. परंतु कामवासनेला काहीतरी मार्ग काढणे भाग असल्यामुळे, प्रजोत्पादनाकरता समागमाची जरूर आहे या सबबीवर, भटांच्या बडबडीने (लग्नसंस्कार) समागमाची अपवित्रता नाहीशी होते, अशी क्लृप्ती निघाली. वास्तविक घाणेरडी समजलेली गोष्ट राजरोस करण्यास मिळावी याकरता ही युक्ती योजलेली आहे व हे बिंग आता बाहेर पडल्यामुळे विवाहाच्या पावित्र्याचा फुगा फुटलेला आहे. व्यावहारिक दृष्टीने व्यभिचारापासून कोणाचेच नुकसान नाही. समागमाचा तात्त्विक दृष्टीने विचार केल्यास व्यभिचाराचा दर्जा अत्यंत उच्च ठरतो. हे कोणीही समंजस कबूल करील, की सर्वात उच्च प्रकारचा समागम म्हणजे ज्यांचे परस्परांवर उत्कट प्रेम आहे अशा स्त्री-पुरुषांचा समागम. शारीरिक किंवा मानसिक गुणांमुळे परस्परांकडे आकर्षण उत्पन्न झाल्यासच व्यभिचार शक्य होतो. त्यामुळे व्यभिचारी समागम नेहमीच उच्च दर्जाचा असतो. सामान्यत: विवाहांत प्रेम सापडणे कठीण. तेव्हा खऱ्या प्रेमी जोडप्याचा समागम विवाहित जोडप्यांत सापडण्याचा संभव फारच कमी असतो.’
– ‘व्यभिचाराचा प्रश्न’.. लेखक : प्रो. र. धों. कर्वे
सुमारे शंभर वर्षांपूर्वी या द्रष्टय़ा समाजसुधारकाने आणि विचारवंताने व्यक्त केलेले स्त्री-पुरुष व्यभिचारासंबंधातले हे विचार मनोमनी कितीही पटले (आणि बहुतांशी ते सत्यही असले!) तरी आजही जाहीररीत्या समाजमन ते मान्य करणं शक्य नाही. मग शंभर वर्षांपूर्वी या मताचा साधा उच्चारही किती भीषण वादळी ठरला असेल याची कल्पनाच केलेली बरी. स्वाभाविकपणेच या लेखावर सनातन्यांनी प्रचंड झोड उठवून र. धों. कव्र्यावर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली. ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर खटला भरला. या विषयासंबंधातील सनातन्यांचा पोकळ युक्तिवाद आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी प्रतिपादनानं हिरीरीनं खोडून काढूनही आंधळ्या न्यायपालिकेनं र. धों.नाच दोषी ठरवलं.
भारतात संततीनियमन तसेच लैंगिक स्वास्थ्यासह समाजाच्या सर्वागीण स्वास्थ्याचा विचार रुजविण्यासाठी आपली सबंध हयात खर्ची घालणारे र. धों. कर्वे आजही उपेक्षित आहेत. आपण आज प्रगत, आधुनिक झालो असल्याची कितीही शेखी मिरवीत असलो तरी सद्य: राजकीय-सामाजिक परिस्थिती पाहता आपणही त्या काळाच्या फारसे पुढे गेलेलो नाही हे स्पष्ट दिसते. त्यामुळे र. धों. कर्वे पचवणं आपल्याला आजही जड जातात. असो.
हे सगळं पुराण उगाळायचं कारण.. नाटककार अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक! नुकतंच ते रंगभूमीवर आलं आहे. (र. धों.वर यापूर्वी अमोल पालेकरांनी ‘ध्यासपर्व’ हा सिनेमा केला आहे.) र. धों.चं जीवनकार्य आणि त्यांचा संततिनियमन व समाजस्वास्थ्याचा लढा लोकांसमोर नव्यानं यावा, हा नाटकाचा हेतू आहेच; शिवाय यानिमित्तानं आजच्या समाजात वाढीस लागलेली विचारहीनता, विवेकवादाला दिली गेलेली सोडचिठ्ठी व वाढत्या असहिष्णुतेकडे निर्देश करण्याचाही उद्देश त्यामागे आहे. किंबहुना, हाच मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित करण्याचा नाटकाचा मानस आहे. या अर्थानंही र. धों.च्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचं नाव नाटकाला दिलं गेलं असावं. समाजाचं स्वास्थ्य टिकवायचं तर मत-मतांतरांचा गलबला व्हायला हवा, सहिष्णु वादविवादांतूनच समाज पुढे जात असतो, हा विचार यामागे आहे. आणि तो रास्तच होय.
एकीकडे हे चरित्रात्मक नाटक आहे, हे तर खरंच. र. धों. कर्वे या व्यक्तीचं कार्य, त्यासाठी त्यांनी मोजलेली किंमत, तसंच त्यांच्या कार्याचं मूल्यांकन ‘समाजस्वास्थ्य’मध्ये अपेक्षित आहे. त्यादृष्टीनंच संहितेची रचना केली गेली आहे. अजित दळवींसारखा समर्थ लेखक या विषयाला हात घालतो तेव्हा त्यामागे त्यांचाही काहीएक वेगळा विचार असतोच. र. धों.चं समग्र जीवन उभं करण्याऐवजी ते त्यांच्या विहित कार्यात आलेली विघ्नं, ज्या समाजासाठी आपण हे सारं करतो आहोत- त्या समाजानेच या कार्यात कोलदांडे घालण्याचे केलेले प्रयत्न, ज्यांच्या न्यायबुद्धीवर विसंबून विहित कार्य सिद्धीस न्यावं- त्या शासन व न्यायव्यवस्थेनंच केलेला घोर अन्याय आणि या सगळ्याशी र. धों.नी दिलेली प्रखर वैचारिक झुंज, त्यात त्यांना आलेलं अपयश.. तरीही विजीगिषु वृत्तीनं आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी दिलेला अथक लढा.. हा या नाटकाचा पट आहे. यात र. धों.चं व्यक्तिगत जीवन मात्र फार आलेलं नाही. आपल्या नायकाचं जीवनकार्य ठळकपणे अधोरेखित करण्याच्या हेतूनं लेखकानं हे बुद्धय़ाच केलं असावं. नाटकातील भाषा तत्कालीन वाटावी अशा तऱ्हेनं योजिली आहे. नाटकातलं प्रत्येक पात्र ठसठशीतपणे चितारलं गेलं आहे. तथापि, र. धों.वरच्या खटल्यांतच नाटक अधिक गुंतून पडलं आहे. त्यांचे संततिनियमन केंद्रातील अनुभव, तसंच स्वत:ला मूल होऊ न देण्याचा उभयतांनी विचारपूर्वक घेतलेला निर्णय या गोष्टीही नाटकात येत्या तर त्यांच्या वैचारिक प्रतिपादनाला सजग कृतीची लाभलेली जोडही लोकांसमोर येती.
दिग्दर्शक अतुल पेठे यांनी प्रयोगाचं ‘पीरियड प्ले’ हे रूप कायम राखताना त्याद्वारे समकालीन परिस्थितीवर भाष्य करण्याची संधीही साधली आहे. अहिताग्नी राजवाडे व त्यांच्या भक्तगणांच्या रूपात आज फोफावत चाललेल्या कर्मठ, सनातनी प्रवृत्तींकडेही त्यांनी ठोसपणे निर्देश केला आहे. आपल्या नेत्याच्या चुकीच्या मतांचा वा अनुचित वर्तनाचा पर्दाफाश करणाऱ्याविरोधात त्याचे चमचे कसे हिंसक प्रतिक्रिया देतात, हे गांधीजींच्या ब्रह्मचर्यासंबंधीच्या मताविरोधात वक्तव्य करणाऱ्या र. धों.ना आलेल्या अनुभवावरून दिसून येते. सर्वसामान्यांचं राहू द्याच; पण पारंपरिकतेच्या पगडय़ामुळे (बुद्धीला पटत असूनही) सत्य स्थिती व वास्तव न स्वीकारण्याचा बुद्धिवाद्यांचा कमकुवतपणाही र. धों.नी उघड केला. जो दांभिकपणा स्वत:ला आधुनिक व प्रगत म्हणविणाऱ्या आपणातही आज मागल्या पानावरून पुढे सुरूच आहे. अशी अनेक वैश्विक तथ्यं नाटकात मांडली गेली आहेत. समाजप्रबोधनाचा वसा किती तर्ककर्कश्श आणि निष्ठुर असू शकतो, हेही र. धों.च्या व्यक्तित्त्वातून कळून येतं. पेठे यांनी यातली सगळी पात्रं यथार्थपणे उभी राहतील याची कसोशीनं दक्षता घेतली आहे. नेपथ्यादी तांत्रिक बाबींत काळाचे संदर्भ वास्तवदर्शी राहतील हेही उन्मेखून पाहिलं आहे.
नेपथ्यकार प्रदीप मुळये यांनी ९० वर्षांपूर्वीचं र. धों.चं गिरगावातलं घर तसंच न्यायालय तपशिलांनिशी साकारलं आहे. आशीष देशपांडेंच्या रंगभूषेनं आणि माधुरी पुरंदरेंच्या वेशभूषेनं पात्रांना व्यक्तिमत्त्व प्रदान केलं आहे. प्रदीप वैद्य (प्रकाशयोजना) आणि नरेंद्र भिडे (संगीत) यांनी नाटकातील धीरगंभीर वैचारिक वातावरणास पोषक कामगिरी बजावली आहे.
र. धों.चं काहीसं एकसुरी, अनाकर्षक, परंतु ठाम वैचारिक बैठक असलेलं व्यक्तिमत्त्व गिरीश कुलकर्णी यांनी उत्तमरीत्या पेललं आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात, हालचालींत आणि एकूणच देहबोलीत समाजसुधारकी विचारवंताची दृढता दृगोचर होते. राजश्री सावंत-वाड यांनी मालतीबाई कव्र्यानी र. धों.ना दिलेली प्रगल्भ, समंजस साथ तितक्याच धीरोदात्तपणे दर्शवली आहे. रणजीत मोहिते यांनी अहिताग्नी राजवाडय़ांचा सनातनी आक्रस्ताळेपणा दाखवताना आपल्या कर्मठ विचारांशी असलेली ठाम बांधीलकीही ढळू दिलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी र. धों.ना दिलेला सक्रीय वैचारिक पाठिंबा अजित साबळेंनी त्याच ताकदीनं पोचवला. नाटककार मामा वरेरकरांचं पुरोगामी व्यक्तिमत्त्व अभय जबडे यांनीही भारदस्ततेनं वठवलंय. आशीष वझे (इंद्रवदन मेहता), कृतार्थ शेवगांवकर (शेटे वकील), नीरज पांचाळ (मॅकन्झी), करण कांबळे (मानकर वकील), संतोष माळी (इन्स्पेक्टर आचरेकर/ गांधीवादी), धनंजय सरदेशपांडे (गांधीवादी), तसंच अनुप सातपुते, प्रशांत कांबळे, राजस कोठावळे, ओंकार शिंदे आणि रेखा ठाकून या सर्वानीच आपापल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका चोख वठवल्या आहेत.
चरित्रनाटय़ाच्या आडून समकालीन परिस्थितीकडे निर्देश करणारं हे नाटक आपली संवेदनशीलता तपासण्यासाठी प्रत्येकानं आवर्जून पाहायलाच हवं.