दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांनी तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुमारे सहा महिने कामातून ब्रेक घेतला आहे. सगळ्या चित्रपटांचं काम पूर्ण केल्यानंतर, तिने विश्रांती घेण्याचं ठरवलं असून आणि सोशल मीडियावर तिने याबद्दलही माहिती दिली आहे. नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने घेतलेल्या ब्रेकमुळे समांथाचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
चित्रपटातून घेतलेल्या ब्रेकमुळे, समंथा रुथ प्रभूने सध्या तेलुगू, हिंदी आणि तामिळ भाषेतील कोणतेही प्रोजेक्ट साइन न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे तर काही निर्मात्यांकडून घेतलेले पैसेदेखील अभिनेत्रीने परत केल्याचंही सांगण्यात येत आहे. ‘ग्रेट आंध्रा.कॉम’च्या एका रिपोर्टनुसार या सगळ्यामुळे समांथाला या कालावधीत अनेक कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे.
आणखी वाचा : सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”
समांथा एका चित्रपटासाठी ३.५ ते ४ कोटी रुपये घेते. परंतु त्याने आधीच तीन चित्रपट साइन केले असल्याने, तिला १० ते १२ कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. समांथाने किमान सहा महिन्यांसाठी अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी तिला तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. ती तिच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणार असून यूएस मध्ये तिच्या ऑटोइम्यून कंडिशन मायोसायटिससाठी उपचारदेखील ती घेणार आहे.
एकूणच गेल्यावर्षी एका पाठोपाठ एक चित्रपट आणि सीरिजचं चित्रीकरण यामुळे काही काळ आराम म्हणून समांथाने ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला असल्याचं तिच्या जवळच्या लोकांनी सांगितलं आहे. सध्या समांथा केवळ स्वतःच्या तब्येतीवर लक्ष देणार असून २०२४ हे वर्षंदेखील तिच्यासाठी खास असणार आहे. ‘सिटाडेल’सह आणखी काही मोठ्या प्रोजेक्टचीही घोषणा समांथा करणार आहे.