Samantha Ruth Prabhu Motherhood Dream : अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या जीवनात अनेक चढउतार आले, पण ती सर्व संकटांवर मात करत पुढे गेली. अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट, नंतर ‘मायोसिटिस’ आजार या सर्व संकटांवर मात करत तिने व्यावसायिक आयुष्यात चांगलं यश मिळवलं. नुकतंच समांथाची ‘सिटाडेल: हनी बनी’ ही नवी वेब सीरिज आली आहे. यात तिने गुप्तहेर असलेल्या आईची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे. एका मुलाखतीत तिला या आईच्या भूमिकेबद्दल विचारलं असता तिने खऱ्या आयुष्यात मातृत्वाबद्दल तिची एक इच्छा व्यक्त केली आहे.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत समांथाने सांगितलं की, तिने ‘सिटाडेल: हनी बनी’ मध्ये आईची भूमिका साकारली असून तिला खऱ्या आयुष्यातही आई व्हायचं आहे. तिने सांगितलं की, तिच्या आयुष्यातील या टप्प्यावर तिची सेटल होण्याची इच्छा अजूनही कायम आहे. वय हा कधीही आई होण्यासाठी अडथळा ठरू शकत नाही, असंही तिने स्पष्ट केलं.
समांथा म्हणाली, “माझं अजूनही आई व्हायचं स्वप्न आहे. हो, मी नेहमीच आई व्हायची इच्छा बाळगली आहे, कारण तो एक सुंदर अनुभव आहे. वयाचा विचार न करता, मी आई होण्याची प्रतीक्षा करतेय. अनेकजण वयाबद्दल चिंता करतात, पण मला वाटतं की आई होण्यासाठी कुठलंही असं ठराविक वय नसतं.”
‘सिटाडेल’ या तिच्या सीरिजमध्ये बालकलाकाराबरोबर काम करताना समांथाला ती जणू काही तिच्या स्वत:च्या मुलीशी संवाद साधत आहे असं वाटलं. या सीरिजमधील बालकलाकाराचं समंथाने खूप कौतुक केलं, तिच्या कामातील हुशारीचं तिनं कौतुक केलं.
हेही वाचा…“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
याच मुलाखतीत, समांथाला तिच्या वैयक्तिक जीवनात झालेल्या मोठ्या बदलांबद्दल विचारण्यात आलं, घटस्फोटानंतरच तिचं आयुष्य आणि ‘मायोसिटिस’ या आजाराशी सामना करतानाच्या अनुभवाबद्दल तिला विचारण्यात आलं. समांथाने म्हणाली, “सध्या मी खूप आनंदी आहे. आता मी स्वतःची काळजी घ्यायला आणि जीवनातील महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकले आहे.”
समांथा पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यात सध्या मी एक चांगला काळ अनुभवतेय. मी दैनंदिन जीवनातील लहान लहान क्षणांचा आनंद घेत आहे. मला दररोज हे आयुष्य जगण्याची संधी मिळत असल्याने मी खरोखर आनंदी आहे. ”
समांथा ‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही बर्वेच्या ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ या आगामी कलाकृतीमध्ये दिसणार आहे.