साउथ स्टार समांथा रुथ प्रभू ही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंटवा’ गाण्यामुळे घराघरांत पोहोचली. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाद्वारे समांथाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आणि समांथा लोकप्रिय अभिनेत्री ठरली. मध्यंतरी अभिनेता नागा चैतन्यबरोबर झालेल्या घटस्फोटानंतर आणि झालेल्या आजारामुळे समांथा चांगलीच चर्चेत होती. मायोसायटीस हा आजार झाल्यानंतर यावरील उपचारासाठी समांथाने चित्रपटातून ब्रेक घेतला अन् ‘यशोदा’ या चित्रपटातून दमदार कमबॅकही केलं.
‘पुष्पा’ चित्रपटात प्रथमच समांथा एका डान्स नंबरच्या माध्यमातून आपल्यासमोर आली. परंतु हा अनुभव समांथासाठी फार चांगला नव्हता. गाण्यासाठीचा पहिला शॉट देताना ती अक्षरशः थरथर कापत होती असा खुलासा तिने केला. इतकंच नव्हे तर यापुढे असा कोणताही डान्स नंबर न करण्याचा निर्णयही समांथाने घेतल्याचं नुकतंच स्पष्ट केलं.
आणखी वाचा : ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ची निराशाजनक सुरुवात; पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख
‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह २०२४’ च्या इव्हेंटमध्ये बोलताना समांथाने ‘पुष्पा’मधील डान्स नंबर आणि ‘द फॅमिली मॅन’ मधील राजी हे तिचं पात्र या दोन्ही फार आव्हानात्मक गोष्टी असल्याचंही स्पष्ट केलं. ‘उ अंटवा’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान तर समांथा ही बरीच अवघडली होती अन् त्यातील तिच्या त्या सेक्सी लूकमुळे ती चांगलीच अस्वस्थ झाली होती हे तिने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.
समांथा म्हणाली, “मी फार चांगली नाहीये, मी इतर मुलींसारखी फार सुंदर नाहीये हा माझा न्यूनगंड आहे ज्याच्याबरोबर मी गेली कित्येक वर्ष डिल करत आहे. त्यामुळे या गाण्याचं चित्रीकरण करणं माझ्यासाठी फार आव्हानात्मक होतं. या गाण्याच्या पहिल्या शॉटच्या वेळी मी अक्षरशः थरथर कापत होते, कारण सेक्सी दिसणं ही गोष्ट माझ्यासाठी तशी नवीनच होती, मला याची अजिबात सवय नव्हती. एक कलाकार म्हणून अन् एक माणूस म्हणून मी स्वतःला अशा आव्हानात्मक अडचणीच्या अन् कठीण प्रसंगात ठेवून त्यातून कायम काहीतरी शिकत आले आहे.”