‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले. राजकीय भूमिका घेत असल्याचं विचित्र कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. “माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात एका महिलेने तक्रार केली होती त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आलं”, अशी माहिती अभिनेते किरण माने यांनी दिली आहे. या प्रकरणावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, दिग्दर्शक समीर विद्वंसने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.
समीर विद्वांसने किरण मानेचे मत न पटल्यामुळे त्याला मालिकेतून काढून टाकले असेल तर हे अन्यायकाराक आहे असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे’ असे ट्वीट समीर विद्वांसने केले आहे.
आणखी वाचा : “हा सांस्कृतिक दहशतवाद…”, किरण माने प्रकरणावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनय करणारे अभिनेते किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारत होते. वेगळा विषय आणि उत्तम मांडणी यामुळे ही मालिका लोकप्रिय ठरली होती. किरण माने यांचा समाजमाध्यमांवर मोठा चाहता वर्ग आहे. ते आपली राजकीय मते समाजमाध्यमांतून सडेतोड मांडत आले आहेत. ही मते केंद्र सरकार आणि भाजपविरोधी असल्याचे त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यामुळे भाजप समर्थकांशी कायमच त्यांची खडाजंगी होत असते.
घडले काय?
काही दिवसांपूर्वी माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये कोणाचेही नाव नव्हते परंतु त्याचा संबंध भाजप समर्थकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याशी जोडला. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. माने यांच्या मताला विरोध दर्शवणारे अधिक आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंनी मर्यादा सोडून संवाद होऊ लागले. समाजमाध्यमांद्वारे त्यांना अनेक धमक्या येऊ लागल्या आणि अशातच त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचे समजले. यामागे राजकीय दबाव असल्याचे वाहिनीतील एका प्रतिनिधीने त्यांना कळवले. राजकीय हस्तक्षेपामुळे काम गमवावे लागल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर करत या घटनेचा निषेध केला. त्यानंतर त्यांच्या पाठिंब्यासाठी अनेक चाहते एकवटले. राजकीय आणि कला वर्तुळातूनही या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त होतो आहे.