Sameer Vidwans on Democracy : महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही वर्षांमध्ये चिखल झाला आहे. गेल्या १० वर्षांमध्ये तर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. यावरून राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरल्याचं नेहमीच बोललं जातं. अलीकडच्या काळात जात व धर्म हे मुद्दे निवडणुकांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. दुसऱ्या बाजूला विकास, बेरोजगारी, उद्योगधंदे, सुविधांचा मुद्दा मागे पडला आहे. तसेच सातत्याने पक्षांतर करणारे नेते, जातीच्या आधारावर राजकारण करणारे पुढारी कितीही उपद्व्याप केले तरी राजकारणातलं त्यांचं स्थान टिकवून आहेत. दरम्यान, राज्यातील व देशातील राजकीय स्थिती पाहून एका मराठी दिग्दर्शकाने संताप व्यक्त केला आहे. मराठी चित्रपट सृष्टीसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस याने समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मतदारांवरील नाराजी देखील व्यक्त केली आहे. आपल्या देशातील लोक व्यक्तीपूजक होते आणि आहेत असंही समीर म्हणाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समीरने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की आपण एकतर ‘तारणारे’ असायला हवं किंवा आपल्याला ‘तारणारं’ कोणीतरी असायला हवं. हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लोकशाही वगैरे नावालाच राहणार! समुहाने निवडून दिलेली राजेशाहीच राज्य करणार! हे कधी बदलेल असं आता वाटत नाही! कारण आपण समाज म्हणून कायम व्यक्तीपूजकच होतो, आहोत आणि तसेच राहणार! लोकशाहीच्या नावाखाली आपणं छोटी छोटी संस्थानं आहोत!

समीर विद्वांसने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव किंवा पक्षाचं नाव नमूद केलेलं नाही. त्यामुळे त्याचा नेमका रोख कोणाकडे होता हे समजू शकलं नाही. मात्र, त्याने एकंदरीत संपूर्ण राजकीय परिस्थितीवर भाष्य केल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. तशाच आशयाचा कमेंट्सही या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

स्वातंत्र्य दिनी समीरने केलेल्या पोस्टची बरीच चर्चा झाली होती

समीर सातत्याने सामाजिक व राजकीय स्थितीवर भाष्य करत असतो. समाजमाध्यमांवर व्यक्त होत असतो. यापूर्वी भारताच्या स्वातंत्र्य दिनी समीरने अशीच एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं, देश म्हणजे फक्त जमीन नाही, देश म्हणजे वेस नाही. देश माणसांनी बनतो, माणूस तत्वांनी बनतो. माणुसकी ही सगळ्याचं मूळ आहे. ती असेल तर जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ग, वर्ण या सगळ्याला एकसमान दर्जा मिळतो. या सगळ्यासकट देश बनतो. लाल किल्यावरून भाषणं देऊन किंवा सोसायट्यांमधून ध्वजारोहण करून किंवा देशभक्तीची गाणी वाजवून उदात्त वगैरे वाटून घ्यायचं देशप्रेम हे वांझोटं आहे. समाज म्हणून आपण कुठे आहोत तिथे देश आहे. आणि मला माफ करा पण समाज म्हणून आत्ता आपण खूप मागे आहोत. कोणापेक्षा नव्हे तर स्वतः पेक्षा! आपण खरंच खूप बरं जगू शकतो जगू देऊ शकतो!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer vidwans remark on political crisis in maharashtra democracy asc