अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी आज मुंबईत. दरम्यान, समीर यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी तिला त्यांच्या मुलींशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले होते. क्रांती तेव्हा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
क्रांती रेडकरने काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर ‘न्यूज १८’शी चर्चा करताना तिला ‘गेल्या काही दिवसांपासून समीर यांचे मुलांशी कधी बोलणं झालं आहे का? त्यांना ५ मिनिटे कधी मुलांसोबत वेळ घालवायला मिळाला का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत क्रांती म्हणाली, ‘नाही नाही. समीर जेव्हा घरी येतात तेव्हा दोन्ही मुली त्यांच्या पायाजवळ येतात. त्या खूप छोट्या आहेत त्यामुळे त्यांच्या पायाजवळच येतात आणि पायाला बिलगतात. डॅडी डॅडी करत असतात. समीरसारखे फोनवर असल्यामुळे ते त्या दोघींना वेळही देऊ शकत नाहीत.’ दरम्यान क्रांती भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा : IPL मॅच फिक्सिंग प्रकरणावरुन चुकीचे वृत्त देणाऱ्यांवर संतापली क्रांती रेडकर, म्हणाली…
समीर यांची बदली झाली तर…
क्रांती रेडकरने समीर यांच्या संभाव्य बदलीसंदर्भात देखील भाष्य केलंय. “थोड्यावेळाने समीर वानखेडेंची बदली झाल्याची बातमी पण येऊ शकते त्यावर काय प्रतिक्रिया असेल?”, असा प्रश्न क्रांती यांना विचारण्यात आला. “अगदीच हा अजेंडा आहे की त्यांना या जागेवरुन काढून टाकायचं आहे. कारण की सच्चा माणूस आहे. कोणाच्या चुकीच्या ऑर्डर ऐकत नाही, पैसे खात नाही, इमानदार आहे. तर अशी माणसं टीकत नाहीत. खऱ्याचा जमाना नाहीय. त्यामुळे त्यांची बदली झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असं क्रांती म्हणाली.