ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेलं आहे. वाराणसीतील न्यायालयाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं. या सर्वेदरम्यानचे व्हिडीओ ३० मे २०२२ रोजी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांना सोपवण्यात आले. दरम्यान या सीडीमधील काही व्हिडीओ लीक झाल्याचा आरोप हिंदू पक्षकारांनी केला आहे. लीक झालेल्या या व्हिडीओमध्ये शिवलिंग, त्रिशूल अशी चिन्हं दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.
हे प्रकरण ताजं असतानाच अभिनेता अक्षय कुमारने याबाबत आपलं मत मांडलं आहे. नवभारत टाइम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत अक्षयला विचारण्यात आलं. यावेळी अक्षय म्हणाला, “जो व्हिडीओ समोर आला आहे त्याबाबत सरकार, एएसआय, पुरातत्तव सर्वेक्षण विभाग, न्यायाधीश योग्य ते मत मांडू शकतील. त्यांना याबाबत अधिक माहिती असावी. मला याबाबत काहीच माहित नाही. ज्या गोष्टीची माझ्याकडे माहिती नसते त्याबाबत बोलणं मी नेहमीच टाळतो. मी हा व्हिडीओ पाहिला आहे. आपल्याला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फारसं समजणार नाही. पण व्हिडीओ पाहिला की ते शिवलिंग आहे असं दिसतं.”
आणखी वाचा – केकेच्या निधनानंतर इमरान हाश्मी ट्विटरवर होतोय ट्रेंड, पण यामागचं नेमकं कारण काय?
आणखी वाचा – “हा चित्रपटही पाहणार नाही कारण…”, Lal Singh Chaddhaचा ट्रेलर पाहून संतापले लोक
देशभरात गेल्या काही दिवसांपासून ज्ञानवापी मशीद प्रकरण चांगलं गाजत आहे. आता हा नवा व्हिडीओ समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ज्ञानवापी परिसरात एक नंदी दिसत असून त्याच्या समोर ८३ फुटांवर वजूखाना आहे. याच ठिकाणी शिवलिंगसारखी आकृती सापडली आहे. नंदीचं तोंड नेहमी शिवलिंगच्या दिशेने असतं असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे. पण मुस्लिम पक्षकार मात्र हे पाण्याचे कारंजे असल्याच्या दाव्यावर ठाम आहेत.
अक्षय आपल्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसीला गेला होता. तिथे त्याने गंगा आरती देखील केली. त्याचबरोबरीने गंगेमध्ये उडी देखील मारली. यादरम्यानचे अक्षयचे काही फोटो आणि व्हि़डीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.