२०२३ ची सुरुवात शाहरुख खानच्या ‘पठाण’ने केली तर त्यावर्षीचा शेवटही रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ने दणक्यात केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ‘अॅनिमल’वर बऱ्याच लोकांनी टीका केली अन् त्यांना नुकतंच संदीप रेड्डी वांगा यांनी मुलाखतीच्या माध्यमातून उत्तर दिलं. ‘अॅनिमल’नंतर संदीप रेड्डी वांगा प्रभासबरोबरच्या ‘स्पिरीट’ या चित्रपटावर व अल्लू अर्जुनबरोबर एका चित्रपटावर काम सुरू करणार अशी चर्चा रंगली होती. ‘स्पिरीट’ची कथा तयार असून २०२४ च्या शेवटच्या महिन्यांत चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
आता मात्र संदीप रेड्डी वांगा यांचा ‘स्पिरीट’ पुढे ढकलला जाऊ शकतो असे वृत्त समोर आले आहे. ‘तेलुगूसिनेमा.कॉम’च्या वृत्तानुसार ‘अॅनिमल’च्या यशानंतर संदीप रेड्डी वांगा यांना त्यांचा आगामी चित्रपट आणखी मोठा आणि भव्य करायचा आहे ज्याची सर्वत्र चर्चा होईल. मीडिया रीपोर्टनुसार मार्च २०२४ पासून संदीप रेड्डी वांगा याच्या स्क्रिप्टवर काम सुरू करतील ज्यासाठी त्यांना ७ ते ८ महीने लागू शकतात.
आणखी वाचा : ‘मिस्टर इंडिया’दरम्यान अनिल व बोनी कपूर होते चिंताग्रस्त; शेखर कपूर म्हणाले, “त्यांच्या कुटुंबाचा पैसा…”
याचाच अर्थ २०२४ ऐवजी चित्रीकरणाला सुरुवात होण्यासाठी २०२५ साल उजाडणार हे नक्की आहे अन् हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचाच परिणाम ‘अॅनिमल पार्क’ व अल्लू अर्जुनच्या चित्रपटावर पडू शकतो. शिवाय प्रभासचा २०२४ मध्ये ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे यामुळेच २०२४ मध्ये संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटासाठी प्रभासला वेळ देता येणार नसल्याने ‘स्पिरीट’ पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
‘अॅनिमल’प्रमाणेच संदीप रेड्डी वांगा यांना ‘स्पिरीट’साठी पुरेसा वेळ द्यायचा आहे अन् यासाठी संदीप यावर अधिक मेहनत घेणार असल्याचं त्यांच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट करत आहेत. अद्याप ‘स्पिरीट’बद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटात प्रभास एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटात प्रभास आजवर कधीच न पाहिलेल्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं संदीप यांनी त्यांच्या काही मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं आहे.