मराठी रंगभूमीवर नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. अनेक दर्जेदार नाटकांना हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. त्यापैकीच गेली काही वर्ष प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेला नाटक म्हणजे संगीत देवबाभळी. पण मात्र आता लवकरच हे नाटक नाट्य रसिकांचा निरोप घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१७ साली भद्रकाली प्रोडक्शन्सची निर्मिती असलेलं ‘संगीत देवबाबळी’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि या नाटकाने विक्रमी कामगिरी केली. या नाटकाला प्रेक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या नाटकाची कथा, या नाटकाचं दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय, या नाटकातली गाणी या सगळ्याचंच प्रेक्षकांकडून खूप कौतुक केलं गेलं. पण आता या नाटकाचे शेवटचे काही प्रयोग होणार आहेत, असं या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितलं.

आणखी वाचा : रितेश-जिनिलीयाचं ‘वेड’ प्रेक्षकांना भावलं, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतके’ कोटी कमावत चित्रपटाची कौतुकास्पद कामगिरी

त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं, “२२ डिसेंबर २०१७ म्हणजे तब्बल ५ वर्षांपुर्वी ‘संगीत देवबाभळी’ हा प्रवास तुमच्या साक्षीने सुरु केला. नवं संगीत नाटक फक्त दोन मुली एक नवीन, दुसरी अनुभवी, नवा लेखक-दिग्दर्शक, नवा संगीत दिग्दर्शक, नवा प्रकाशयोजनाकार अशा अनेक प्रश्नांवर स्वार होऊन भद्रकाली च्या ह्या नाटकाने ५ वर्षात महाराष्ट्र शासन, झी नाट्य गौरव, म. टा. सन्मान असे आणि याशिवाय अनेक मानाचे पुरस्कार पटकावले ह्यावर कळस होता तो संगीत देवबाभळी नाटकाच्या संहितेला मिळालेला युवा साहित्य अकादमी पुरस्कार. सगळा स्वप्नवत प्रवास…”

एकूण मिळालेल्या सर्वाधिक ४४ पुरस्कारांपेक्षाही सगळ्यात मोठा पुरस्कार होता तो… रसिक मायबापहो तुमचं प्रेम. कुणी भरभरून लिहायचं कुणी मिठ्या मारायचं, कुणी पाया पडायचं कुणी २२-२२ वेळा नाटक पहायचं हे सगळं किती अविश्वसनीय आहे! ‘भद्रकाली’ने नेहमीच नवता आणि मनोरंजनाचा ध्यास घेतला स्व. मच्छिंद्र कांबळी ह्यांचा वारसा पुढे नेताना त्याला आणखी वैभवशाली करण्याकडेच आमचा कल होता आहे आणि अर्थात पुढे राहिल. पण थांबायचं ठिकाण माहित नसतांना सुरु असलेल्या प्रवासाला भटकणं म्हणतात आणि वारी एकदा मुक्कामाला पोचली की परतवारी करणं भागच असतं. तर रसिक मायबापहो परतवारी सुरु होतेय. येत्या काही दिवसात आम्ही पुन्हा त्याच तन्मयतेने तुमच्या पुढं येतोय पण आता हे निरोपाचे प्रयोग असतील भेटूया तुमच्या जवळच्या नाट्यगृहात बरं नाट्यगृह जवळ नसलं तरी आता मात्र भेटायचं चुकवू नका कारण….. संगीत देवबाभळी… निरोपाचे काही प्रयोग.”

हेही वाचा : “आतापर्यंत ते शक्य झालं नाही, पण…” सायली संजीवने व्यक्त केली मनातली सुप्त इच्छा

प्राजक्ताच्या या पोस्टमुळे नाट्यरसिक निराश झाले असून अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत “हे नाटक कृपया थांबवू नका,” ” या नाटकाचे प्रयोग थांबले तर या नाटकातली गाणी प्रदर्शित करा,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangeet devbabhali marathi play will be ending soon rnv