शतकापूर्वी रंगभूमीवर आलेले आणि रसिकमनांत विराजमान झालेले ‘संगीत मानापमान’ हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक आणि त्यातील गाजलेली नाट्यपदं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. याच अभिजात नाटकावरून प्रेरित असलेल्या ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातही १८ प्रतिभावंत गायकांनी गायलेल्या १४ गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या चित्रपटातील गाण्यांचा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. चित्रपटाचे संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांच्यासह गायक-गायिका, संगीत-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटासाठी एकूण १४ गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर स्वत: शंकर महादेवन यांच्यासह सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा १८ गायक-गायिकांनी ही गाणी गायली आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत.
हेही वाचा >>>किम कार्दशियनच्या पायाला गंभीर दुखापत; कुबड्यांचा आधार घेऊन फिरतेय अभिनेत्री, म्हणाली…
‘संगीत मानापमान’ हा चित्रपट मराठी संगीत रंगभूमीच्या शाश्वत कलेला केलेले अभिवादन आहे, त्यामुळे या चित्रपटाचं सुमधुर संगीत आणि कथा महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांनासुद्धा नक्की आवडेल, असा विश्वास यावेळी जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे यांनी व्यक्त केला. तर १८ विलक्षण प्रतिभावान गायकांबरोबर काम करणं हा एक अद्भूत अनुभव होता, अशी भावना शंकर महादेवन यांनी व्यक्त केली.
‘मी याआधीही अभिनेता सुबोध भावेच्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला संगीत दिलं होतं. मात्र ‘संगीत मानापमान’ हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. या चित्रपटासाठी समीर सामंत या गायकाने खूप सुंदर गाणी लिहिली आहेत. जिओ स्टुडिओजच्या निमित्ताने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाला मोठं व्यासपीठ मिळालं असून ‘सारेगामा’सारख्या मोठ्या संगीत कंपनीच्या माध्यमातून ही गाणी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे’, असेही महादेवन यांनी सांगितलं. ‘संगीत मानापमान’चे दिग्दर्शन आणि त्यातली धैर्यधराची मुख्य भूमिका अशा दोन्ही धुरा अभिनेता सुबोध भावे यांनी सांभाळल्या आहेत. सुबोधसह या चित्रपटात सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहेत, तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. संगीतमय नजराणा असलेला ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.