‘संगीत मानापमान’ हा चित्रपट ११३ वर्षे जुन्या संगीत नाटकावर आधारित आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेल्या आणि गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी नटलेले ‘मानापमान’ हे संगीत नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. मात्र या नाटकाची रंजक परीकथा आणि त्यातली गाजलेली निवडक गाणी यांचा समावेश वगळला तर सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट मूळ नाटकापेक्षा पूर्ण भिन्न अनुभव आहे. ‘मानापमान’ नाटकाच्या चष्म्यातून हा चित्रपट पाहणं योग्य ठरणार नाही.

‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीत आहे, त्यामुळे पहिल्या दृश्यचौकटीपासून गाणी आपल्याला साथ करतात. मूळ नाटकातील कथा ही प्रेमकथा आहेच, शिवाय काहीशी जुन्या परिचित धाटणीची म्हणजे नायक-नायिका आणि खलनायक अशी ढोबळ मांडणी असलेली आहे. तरीही शतकापूर्वी लिहिलेल्या या नाटकाची नायिका भामिनी, राणीसाहेब ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा आणि अगदी नायक धैर्यधराची आई चिमणाबाई या तिन्ही स्त्री व्यक्तिरेखा अत्यंत तडफदार, स्वतंत्र बाण्याच्या आणि आपल्याला काय हवे आहे याची स्पष्टता घेऊन जगणाऱ्या आहेत. संग्रामपूर नामक संस्थानाची ही कथा आहे. या संस्थानाची धुरा राणीसाहेबांच्या हातात आहे. त्यांचे राज्य सक्षमपणे चालवणारे काकासाहेबांसारखे हुशार, पराक्रमी आणि संयमी व्यक्तिमत्त्वाचे सेनापती आहेत. भामिनी ही काकासाहेबांची कन्या. श्रीमंतीत आणि काहीशी लाडाकोडात वाढलेली भामिनी. संग्रामपूरचे उपसेनापती चंद्रविलास आणि भामिनी यांची लहानपणापासूनची मैत्री आहे. मात्र, चंद्रविलासने मनातल्या मनात भामिनीची भावी सहचारिणी म्हणून चित्रे रंगवायला सुरुवात केली आहे. आपणच भविष्यातील संग्रामपूरचे सेनापती आणि भामिनी आपली राणी या चंद्रविलासच्या स्वप्नांना धैर्यधर नावाच्या वीर धुरंधर युवकाच्या अचानक प्रवेशाने तडे जातात. काकासाहेब भामिनीपुढे धैर्यधराचा पती म्हणून विचार करण्याचा प्रस्ताव ठेवतात. एरवी वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्या भामिनीला वडिलांनी असं कोणालाही आपल्यासमोर वर म्हणून उभं करावं हे अजिबात रुचत नाही. भामिनी आणि चंद्रविलास यांच्या मनात धैर्यधराविरोधात धुमसत असलेला राग आणि या सगळ्याची सुतराम कल्पना नसलेल्या केवळ संग्रामपूरचा शूर सैनिक म्हणून त्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने तलवार हाती घेऊन सहकाऱ्यांबरोबर लढणाऱ्या धैर्यधराचे निरलस प्रेम यातून ‘संगीत मानापमान’चे नाट्य रंगत जाते.

हेही वाचा >>> Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट

‘संगीत मानापमान’ ही प्रेमकथाही आहे आणि सत्तासंघर्षातून रंगणारे हेवेदावे, लोभ, मत्सर या नाट्याची किनारही धैर्यधर आणि भामिनीच्या प्रेमाला आहे. हे नाट्य चित्रपट माध्यमात खुलवायचं तर त्याची पटकथा महत्त्वाची ठरते. ‘मानापमान’ या नाटकाचे परिपूर्ण माध्यमांतर म्हणून या चित्रपटाकडे पाहता येणार नाही. मात्र, त्यातली प्रेमकथा आणि सत्तेच्या अनुषंगाने खुलत जाणारं नाट्य केंद्रस्थानी घेऊन चित्रपट रूपात कथा रंगवताना दृश्यात्मक मांडणी, पटकथा, संगीत, पार्श्वसंगीत अशा प्रत्येक मूलभूत गोष्टींचा बारकाईने विचार केला गेला आहे हे चित्रपट पाहताना जाणवते. ही परीकथा असल्याने संग्रामपूर नामक संस्थान आणि गाव उभे करताना त्यातला काळ जुना आहे हे लक्षात येत असलं तरी अमुक एका काळाचा संदर्भ त्याला जोडण्यात आलेला नाही. आणि त्या अर्थाने अमुक एक काळ रंगवण्यासाठी म्हणून वापरण्यात येणारे विशिष्ट रंगाचे टोनही त्यात वापरलेले नाहीत.

सर्वसाधारणपणे राजेमहाराजांच्या काळात घडणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे पात्रांच्या तोंडी येणारी भाषा, त्यांची वेशभूषा आदी बाबींमध्ये लोक गुंतून पडणार नाहीत, पण त्यातल्या नाट्याकडे आकर्षित होतील अशा पद्धतीचे पटकथा लेखन शिरीष देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांनी केले आहे. प्राजक्त देशमुख यांनी केलेल्या संवादलेखनाचाही उल्लेख करायला हवा, कारण या सगळ्याचा प्रभाव चित्रपटावर जाणवतो. चित्रपटात मिळणाऱ्या दृश्याविष्काराच्या स्वातंत्र्याचा फायदा घेत व्हीएफएक्सच्या साहाय्याने मात्र त्याचा अतिवापर टाळत संग्रामपूरची मांडणी करण्यात आली आहे. शिवाय, मूळ नाटकाप्रमाणेच संगीत हा या चित्रपटाचाही आत्मा आहे, मात्र इथे त्याचा फार वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला आहे.

‘संगीत मानापमान’ चित्रपटाची गाणी हा खरं तर स्वतंत्र विषय ठरावा. १८ गाण्यांपैकी मूळ नाटकातील ‘शूरा मी वंदिले’, ‘नाही मी बोलत’, ‘रवि मी’, ‘मला मदन भासे हा’, ‘रण गगन सदन’ अशी काही मोजकीच पदे चित्रपटात आहेत. मात्र, चित्रपट संगीताच्या दृष्टीने त्यांची रचना करण्यात आली आहे. ‘मानापमान’ नाटकातील गाणी म्हणजे रसिकांच्या मर्मबंधातली ठेव… याचं भान ठेवून दिग्दर्शक सुबोध भावे आणि संगीतकार शंकर-एहसान-लॉय या त्रिमूर्तीने कृष्णाजी खाडिलकरांच्या या काही मूळ पदांमधील मुखडा आणि ठरावीक अंतरा घेत ही गाणी चित्रपटात आणली आहेत. याशिवाय, ‘चंद्रिका’, ‘तगमग होते जीवाची’, ‘ऋतु वसंत’, ‘वंदन हो’ अशी गाणी कथा पुढे नेण्याच्या दृष्टीने आणि भावमधुर संगीताची जोड देत रचण्यात आली आहेत. मूळ नाटकातील पदं डोक्यात ठेवून गाणी पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास होऊ शकतो, मात्र ही गाणी कथानकात अडसर ठरणार नाहीत अशा पद्धतीने खुबीने पेरण्यात आली आहेत. त्याचं चित्रणही खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वानगीदाखल सांगायचं तर ‘सांगू कसा मी तुला’ हे गाणं चंद्रविलासच्या तोंडी आहे. या गाण्यातून धैर्यधर आणि भामिनी यांच्या मनात एकमेकांविरोधात विष कालवणारा चंद्रविलास दिसतो. नाटकातील पदांप्रमाणे ताना-आलाप घेत या चित्रपटातील पात्रं गाताना दाखवता येणार नाहीत हे भान जपण्याचा यत्न ‘शूरा मी वंदिले’सारख्या महत्त्वाच्या गाण्यात मात्र तोकडा पडला आहे. पण उपलब्ध गाण्यांबरोबरच समीर सामंतसारख्या तरुण गीतकाराकडून नव्याने लिहून घेतलेली गाणी आणि शंकर महादेवन यांचे संगीत अशी नावीन्यता या चित्रपटामुळे अनुभवता येते. चित्रपटाच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अधिक वेगवान आहे. लढाई, मोहिमा हे सगळं रंगवताना अनेक त्रुटी यात जाणवतात. मात्र जे जे कमी त्याची कसर चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने भरून काढली आहे. धैर्यधराची भूमिका सुबोध भावे यांनी सहजतेने रंगवली आहे. भामिनीच्या स्वभावातील करारीपणा आणि प्रेम यांच्या मिश्र छटा वैदेही परशुरामीनेही त्याच उत्कटपणे रंगवल्या आहेत. सुमित राघवन यांनी चंद्रविलासच्या भूमिकेत जीव ओतला आहे, मात्र त्यांना अधिक वाव मिळायला हवा होता. निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी, उपेंद्र लिमये आणि शैलेश दातार यांच्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटात रंगत आली आहे. संतोष मुळेकर यांचे पार्श्वसंगीतही तितकेच उल्लेखनीय आहे. अभिनय, पटकथा, संगीत या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नातून ‘संगीत मानापमान’मधील परीकथा परिपूर्ण नसली तरी निश्चितच एक नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग आहे.

संगीत मानापमान

दिग्दर्शक – सुबोध भावे

कलाकार – सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमीत राघवन, उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, शैलेश दातार, नीना कुलकर्णी.

Story img Loader