संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो. दिग्गज नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक आणि गायक अभिनेते-अभिनेत्रींनी हे युग गाजविले. बदलत्या काळात संगीत नाटकेही कमी झाली आणि आता तर अपवाद स्वरूपातच संगीत नाटके सादर होत आहेत. युवा गायक अभिनेत्याची वानवा हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. पण असे असले तरी प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनने सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या संगीत नाटकाला प्रेक्षकांचा विशेषत: तरुण पिढीचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. युवा गायक अभिनेते-अभिनेत्री या नाटकात काम करत आहेत. संगीत नाटकांचा सांस्कृतिक ठेवा जतन आणि संवर्धन करण्यासाठी शास्त्रीय व नाटय़ संगीत आणि रंगभूमीशी संबंधित सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे झाले आणि युवा गायक अभिनेते व अभिनेत्रींनी सुराला अभिनयाची साथ दिली तर संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा नक्कीच जिवंत होईल..
काही दिवसांपूर्वी ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’तर्फे ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले असून त्याला रसिकांचा विशेषत: तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोविंद बल्लाळ देवल यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक पुन्हा नव्या दमाने रंगभूमीवर सादर झाले असून मूळ नाटकात असलेली ३० गाणी (नाटय़पदे) नवीन नाटकात १८ वर आणण्यात आली आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह गायक राहुल देशपांडे काम करत आहेत. अलीकडच्या काही वर्षांत काही जुनी मराठी संगीत नाटके नव्या कलाकारांच्या संचात सादर झाली. यात ‘संगीत सौभद्र’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दोन वेगवेगळ्या नाटय़संस्थांनी हे नाटक रंगभूमीवर सादर केले. एका नाटकात गायक आनंद भाटे, राहुल देशपांडे, अजय पुरकर हे कलाकार होते. तर अन्य एका संस्थेच्या याच नाटकात विक्रांत आजगावकर या पुरुष कलाकाराने साकारलेली ‘सुभद्रा’ हे त्या नाटकाचे खास वैशिष्टय़ ठरले होते. ‘संगीत सरगम’ या नाटकात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काम केले होते. ‘संगीत रेशीमगाठी’ आणि ‘संगीत मृगरजनी’ ही संगीत नाटकेही काही वर्षांपूर्वी सादर झाली होती. ‘अवघा रंग एकची झाला’, ‘जिंकू या दाही दिशा’, ‘बया दार उघड’ ही अलीकडे सादर झालेली संगीत नाटके. या सर्व नाटकांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही नव्या कलाकारांचे पदार्पणही या निमित्ताने रंगभूमीवर झाले होते.
संगीत नाटकांमध्ये त्यातील गाणी (नाटय़पदे) हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. शास्त्रीय संगीत शिकणारे किंवा शास्त्रीय संगीतात विशारद झालेले आणि सुरेल गळा असणारे अनेक तरुण गायक-गायिका सध्या आहेत. ते उत्तम गातातही. अनेक युवा तरुण-तरुणी किंवा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शास्त्रीय संगीत शिकत आहेत. पण त्यांच्यापैकी अपवाद वगळता बहुतांश जणांचा अभिनय करण्याकडे कल नसतो. शास्त्रीय संगीत, नाटय़ संगीताच्या मैफली किंवा वैयक्तिक गाण्यांचे कार्यक्रम ते सादरही करत असतात. पण संगीत नाटकात काम करण्याबद्दल त्यांना विचारले तर त्यांचे उत्तर नाही असे असते. म्हणजे जे चांगले गायक-गायिका आहेत त्यांना ‘अभिनय’ करण्यात विशेष रुची नसते. हा मुद्दा स्पष्ट करताना ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या नाटय़शाखेचे कार्यवाह सुभाष भागवत यांनी सांगितले, संगीत रंगभूमीसाठी तरुण गायक अभिनेते मिळत नाहीत हे खरेच आहे. हे युवा कलाकार शास्त्रीय संगीत शिकायला तयार असतात, पण संगीत नाटकात काम करण्याची त्यांची तयारी नसते. विशिष्ट वेशभूषा करून उभे राहून गाणे सादर करणे, गाणे संपल्यानंतर पुन्हा गद्य संवाद म्हणणे त्यांना नको असते. मैफलीत गाताना गायकांना समोर गाण्याचा कागद ठेवून गाणे सादर करता येऊ शकते. संगीत रंगभूमीवर तसे करता येत येत नाही. संगीत नाटकात केवळ आपले गाणे सादर करून चालत नाही तर पुढे-मागे असलेले संवाद असतात. म्हणजे जवळजवळ सर्व नाटक त्यांना चोख पाठ करावे लागते. हे पाठांतर करणेही काही जणांना अवघड वाटते. त्यामुळे युवा गायक अभिनेते मिळणे अवघड झाले आहे.
यावर उपाय म्हणून एक नवीन प्रयोग करून पाहिल्याचे भागवत यांनी सांगितले. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’तर्फे आम्ही राज्यस्तरीय नाटय़गीत गायन स्पर्धा घेतो. स्पर्धा सगळ्यांसाठी खुली होतीच पण ज्यांना संगीत नाटकात काम करण्याची इच्छा आहे त्यांनी मोठय़ा संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही केले होते. त्याचा काही प्रमाणात फायदा आम्हाला झाला. नुकतेच साहित्य संघातर्फे ‘संगीत प्रीतीसंगम’ या नाटकाचे दोन प्रयोग आम्ही केले. नाटय़गीत गायन स्पर्धेतून आम्हाला जे दोन-चार गायक अभिनेते मिळाले ते नाटकात काम करत असल्याचे सांगून भागवत म्हणाले, संगीत रंगभूमी हे मराठी रंगभूमीचे वैभव आहे. संगीत रंगभूमीला चांगले गायक अभिनेते मिळावे म्हणून अशा नाटय़गीत गायन स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर घेतल्या जाव्यात. त्यातून भविष्यात नक्कीच चांगले गायक अभिनेते रंगभूमीला मिळतील, असा विश्वास वाटतो.
‘विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान’च्या माध्यमातून श्रीकांत आणि शुभदा दादरकर हे गेली अनेक वर्षे नाटय़संगीताचा पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालवीत आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमातूनही उत्तमोत्तम युवा गायक व गायिका तयार झाले आहेत. या विद्यार्थ्यांना घेऊन दादरकर दाम्पत्य संगीत नाटकातील नाटय़पदांचे किंवा नाटय़प्रवेश सादरीकरणाचे कार्यक्रम करत असतात. नाटय़संगीत अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी काही संगीत नाटकेही सादर केली आहेत. संगीत रंगभूमीवर युवा गायक अभिनेते व अभिनेत्री यांची खरोखरच वानवा आहे का, याबाबत शुभदा दादरकर यांना विचारले असता त्यांनीही संगीत रंगभूमीला युवा गायक अभिनेते-अभिनेत्री मिळत नसल्याच्या मुद्दय़ाला दुजोरा दिला. सध्याच्या काळात करिअर म्हणून अपवाद वगळता युवा कलाकार संगीत रंगभूमीकडे वळत नाहीत हे वास्तव आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे संगीत नाटक हे उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही. यातून मिळणारा आर्थिक लाभ हा कमी आहे. त्यामुळे आजची युवा पिढी छंद म्हणून संगीत नाटकाकडे पाहते, असे निरीक्षणही दादरकर यांनी नोंदविले.
नाटय़गृहांची वाढलेली भाडी, जाहिरातीवर होणारा खर्च आणि या सगळ्यांतून मिळणारा प्रतिसाद पाहता महत्त्वाचे निर्माते संगीत नाटकांची निर्मिती करत नाहीत. आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही आमच्याच विद्यार्थ्यांना घेऊन ‘मदनाची मंजिरी’, ‘सुवर्णतुला’, ‘संगीत संशयकल्लोळ’ अशी तीन संगीत नाटके सादर केली. आमच्या पदवी आणि पदविका नाटय़संगीत अभ्यासक्रमातून आजही अनेक उत्तम युवा गायक-गायिका तयार होत आहेत. त्यांना घेऊन चांगले संगीत नाटक तयार होऊ शकते. पण मोठे आर्थिक पाठबळ नसल्याने संगीत नाटक करणे अवघड होऊन बसते हेही खरे आहे. रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकात काम करणारी उमा पळसुले देसाई, मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘प्रीतीसंगम’मध्ये काम करणारी गौरी फडके या दोघींनीही आमच्या प्रतिष्ठानचा नाटय़संगीत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या दोघी तसेच आमच्या अन्य काही विद्यार्थ्यांनीही संगीत नाटकात कामे केली असल्याचेही दादरकर यांनी सांगितले.
शेखर जोशी