विविध रागांमधील सदाबहार नाट्यपदांनी सजलेले संगीत संशयकल्लोळ हे नाटक पुन्हा नव्या रुपात व नव्या संचात रसिकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या वतीने रंगभूमीवर आणण्यात येणाऱ्या या नव्या नाटकाचा मुहूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेता प्रशांत दामले, गायक राहुल देशपांडे, ज्येष्ठ गायक रामदास कामत, गौरी दामले, संगीत संशयकल्लोळ नाटकातील कलाकार व तंत्रज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संगीत नाटकांनी मराठी मनांवर कायमच अधिराज्य केले आहे. त्यात संगीत संशयकल्लोळ हे नाटक वरच्या स्थानावर आहे. या नाटकातील गाणी, पदे आजही रसिकांना तितकीच भावतात असे हे रसिकप्रिय नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा प्रशांत दामले यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे, असं सांगत या नाटकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. या नाटकाविषयी बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, हे नाटक १०० वर्षापूर्वीचे असले तरी ते आजही ताजे आहे. नव्या पिढीपुढे हे नाटक यावे यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. मूळ नाटकात ३० गाणी होती आम्ही त्यातली १८ गाणी ठेवत हे नाटक सादर करणार आहोत. येत्या १५ एप्रिलला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत असून प्रशांत दामले( फाल्गुन राव), राहुल देशपांडे (अश्विन शेठ), उमा पळसुले-देसाई (रेवती), दिप्ती माटे (कृतिका), चिन्मय पाटसकर (साधू आणि वैशाख), नचिकेत जोग (भाद्व्या), नीता पेंडसे( रोहिणी आणि मघा) हे मुख्य भूमिका साकारत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा