९ ते ११ मार्च दरम्यान मुंबईत प्रयोग
मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील मानाचे पान आणि रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ असलेली नाटय़पदे अशी ‘संगीत सौभद्र’ची ओळख आजही आहे. बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किलरेस्कर यांनी लिहिलेल्या ‘संगीत सौभद्र’चा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर १८८२ या दिवशी पुण्यात झाला. नाटकाला १३६ वर्षे होऊन गेली तरीही नाटकाची आणि त्यातील पदांची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. लोकप्रिय असलेले ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आता पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर होणार आहे. रविवार, ४ मार्च रोजी पुण्यात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. ‘संगीत सौभद्र’ नाटकातील ‘अरसिक किती हा शेला’, ‘नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘प्रिये पाहा रात्रीचा समय सरुन’, ‘बलसागर तुम्ही वीरशिरोमणी’, ‘बहुत नच दिन भेटलो सुंदरीला’, ‘राधा धर मधु मिलिंद’, ‘वद जाऊ कुणाला शरण’ या गाण्यांचे गारुड आजही रसिकांच्या मनावर आहे. नाटय़संगीताच्या मैफलीत यापैकी कोणते ना कोणते पद आजही सादर केले जाते आणि त्याला तेवढय़ाच उत्कटतेने रसिकांची दाद मिळते. अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित या नाटकाचे अनेक प्रयोग आजवर वेगवेगळ्या संस्थांनी केले आणि यापुढेही सादर होत राहतील. २०१२ मध्ये शास्त्रीय संगीत-नाटय़संगीत गायक राहुल देशपांडे यांनी या नाटकाची नव्याने निर्मिती केली. नाटकाचे संकलन आणि दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले होते. या नाटकाची विशेष बाब म्हणजे नाटय़संगीत गायक आनंद भाटे यांनी नाटकात ‘श्रीकृष्ण’ही भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यावेळी या नाटकाचे पन्नासहून अधिक प्रयोग झाले. राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांनी एकाच संगीत नाटकात काम करण्याचा योग या नाटकामुळे जुळून आला होता.
आता पुन्हा एकदा ‘अष्टविनायक’ संस्थेचे दिलीप जाधव, एस. एच. एंटरप्रायजेस्चे समीर हंपी आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे नाटक नव्याने रंगभूमीवर सादर होणार आहे. नाटकाचे फक्त २५ प्रयोग सादर होणार असून नाटकातील ‘सुभद्रा’ आणि ‘अर्जुन’ या भूमिका अनुक्रमे अस्मिता चिंचाळकर आणि अभिनेता आस्ताद काळे यांनी साकारल्या आहेत. तर अन्य भूमिकांमध्ये दीप्ती माटे (रुक्मिणी), चिन्मय पाटस्कर (बलराम), मुक्ता लेले (कुसुम), तेजस दंडगव्हाळ (घटोत्कच) हे कलाकार आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून राजीव परांजपे (ऑर्गन) तर आदित्य पानवलकर (तबला) यांची संगीतसाथ आहे.
नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार ४ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव नाटय़गृह, पुणे येथे होणार आहे. तर ९, १० आणि ११ रोजी मुंबईत नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
संगीत सौभद्र नाटकात एकूण ८८ गाणी होती. मात्र काळानुरूप त्यात बदल होत गेले. नाटकाच्या अंकांची आणि त्यातील पदांचीही संख्या कमी करण्यात आली. त्या त्या पिढीला रुचेल आणि भावेल असे काही बदल नाटकात करण्यात आले. तरी नाटकाचा मूळ गाभा तसाच ठेवण्यात आला. नाटकाचे गीतकार-संगीतकार अण्णासाहेब किलरेस्कर आणि नाटय़पदे गाणारे त्या त्या काळातील मातब्बर गायक-गायिका यांचेही ‘संगीत सौभद्र’ लोकप्रिय करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. ‘संगीत सौभद्र’चे नव्याने सादरीकरण म्हणजे जुन्या पिढीतील रसिकांचे स्मरणरंजन आणि नव्या पिढीसाठी आपल्या अमूल्य ठेव्याची नव्याने ओळख असणार आहे.