भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने बहुजन समाजातून उदयास आलेले निःस्वार्थी नेतृत्त्व राष्ट्रीय क्षितिजावर उत्तुंग भरारी घेण्याआधीच काळाच्या पडद्याआड गेले. या नेत्याची `संघर्षयात्रा’ आता रुपेरी पडद्यावर पहावयास मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित `संघर्षयात्रा’ हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या ११ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्सच्या सुर्यकांत बाजी, संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी आणि राजू बाजी यांनी “संघर्षयात्रा” सिनेमाची निर्मिती केली असून साकार राऊत या नव्या दमाच्या तरुणाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाचा म्युझिक आणि टीझर लौंच सोहळा नुकताच मुंबई येथे सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच भारतीय जनता पक्षाच्या अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. ऊस तोडणीचे काम करणार्‍याच्या  मुलाने साखर कारखाने काढले, तो देशभर फिरला अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केल्या एक उत्तम नेता म्हणून गोपीनाथ मुंडे साहेब हे आपल्या सर्वांचेच लाडके आहेत. सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा असल्याचे अध्यक्ष भाजप मुंबई, आमदार अँड. आशिष शेलार यांनी सांगितले.
मला खरतर ह्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली तेव्हा मी जवळजवळ महिनाभर टाळण्याचा प्रयत्न केला पण साकार काही मला सोडत नव्हता. मी हुबेहूब साहेबांसारखा दिसेन असा उत्तम आत्मविश्वास जो दिग्दर्शक साकारला होता तो मला अजिबात नव्हता. परंतु प्रदीजीनी जेव्हा माझा मेकअप करून गेटअप तयार केला तेव्हा माझ्या लक्षात आले कि पहिल्यापासून साकारच बरोबर होता आणि मी चुकीचा असे या सिनेमात गोपीनाथ साहेबांची मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनता शरद केळकर यांनी सांगितले.
अभिनेता शरद केळकर, गिरीश परदेशी, ओमकार कर्वे सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे, दीप्ती भागवत आणि प्रीतम कांगणे यांनी “संघर्षयात्रा” मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिलेला पोवाद्याला अनिरुद्ध-अक्षय या जोडीने संगीत दिले असून हा पोवाडा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला आहे. अमृता देवेद्र फडणवीस यांनी गायलेले शीर्षक गीत हे मंदार चोळकर यांनी लिहिलेले असून संगीत श्रीरंग उर्हेकर यांचे आहे  सनिश जयराज यांनी कॅमेरामन म्हणून काम पहिले असून अनंत कामत यांनी सिनेमाचे संकलन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा