हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खेळाडूंचा भरणा वाढत आहे. टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि मुष्टियोद्धा विजेंदर सिंगनंतर आता भारताचा कुस्तिपटू संग्राम सिंग मोठ्या पडद्यावरील आगमनासाठी सज्ज झाला आहे. तरुणांना सकारात्मक संदेश देणाऱ्या चित्रपटापासून सुरुवात करण्याची मनिषा असल्याचे त्याने म्हटले आहे. धनराज जेरहानींच्या चित्रपटात संग्राम एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे नाव ‘वंदे मातरम’ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी बोलताना संग्राम म्हणाला, चित्रपटात मी १६ ते १७ वयोगटातील मुलांच्या क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा मादक पदार्थ आणि शरीरसंबंध ठेवताना केल्या जाणाऱ्या अत्याचारांविरोधी संदेश देणारी आहे. या चित्रपटाद्वारे समाजाला सकारात्मक संदेश देण्याची मिळालेली संधी मला खूप भावली. ड्रग्ज आणि सेक्स ह्या तरुणांमधील महत्वाच्या समस्या असल्याचे माझे मानणे आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून समाजातील तरुणवर्गात या विषयी जागृतता निर्माण करून, सकारात्मक संदेश घेऊन जायचे आहे. निर्मात्यांवरील विश्वासामुळे हा चित्रपट स्वीकारल्याचे संग्राम म्हणाला. चांगले आरोग्य प्राप्त करणे, मादक पदार्थांचे सेवन न करणे आणि शारीरिक संबंधांमध्ये अत्याच्यार न करण्यासारखे संदेश ‘वंदे मातरम’ चित्रपटाद्वारे देण्यात येणार असल्याचे सांगत संग्राम म्हणाला, ‘वंदे मातरम’ हे शीर्षक घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, हे शीर्षक न मिळाल्यास ‘युवा’ हे चित्रपटाचे नाव असेल. पाच वर्षांपूर्वी आलेल्या मणिरत्नम यांच्या चित्रपटाचे हे शीर्षक होते हे मला माहित आहे. परंतु, आम्हाला आता ते मिळू शकते.

Story img Loader