बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने त्याचा ५७ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच संजूबाबाने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पत्नी मान्यताने बरीच तयारी केली होती. या पार्टीत संजयचे निकटवर्तीय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.
त्याच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो थोडा वैतागलेला दिसतो. व्हिडिओमध्ये तो प्रसारमाध्यमांना शिवीगाळ करतानाही दिसत आहे. पण याची पुष्टी अजूनही झालेली नाही. पण खरंच असे झाले असेल तर हे प्रकरण संजयला भोवेल हे मात्र नक्की. ”पावसात का उभे आहात? मी तुम्हाला हात जोडून सांगतो की आपआपल्या घरी जा. बायका मुले तुमची वाट बघत असतील.” असे भडकत बोलून तो आत निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये पाहावयास मिळते.
संजय दत्तच्या बायकोने त्याला वाढदिवसाच्या दिवशी ऑडी क्यू ७ ही गाडी भेट म्हणून दिली. या गाडीबरोबर प्रसारमाध्यमांना फोटो हवे होते. पण, संजू बाबाने फोटो काढायला मनाई केली.