१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्तला तुरूंगात शिक्षा भोगण्यासाठी जाण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना त्याने काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण कले असून, काहींचे चित्रीकरण अद्याप बाकी असल्याची माहिती चित्रपटसृष्टीतील सूत्रांकडून मिळाली आहे.
संजय दत्तने पुलिसगिरी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असल्याच्या वृत्ताला या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दुजोरा दिला. संजय दत्त या चित्रपटात पोलिस अधिका-याची भूमिका साकारत आहे. चित्रपट निर्माता टी. पी. अग्रवाल म्हणाले,  या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आम्ही ५ जुलैला चित्रपट प्रदर्शित करू. चित्रपटाच्या प्रचारासाठी आम्ही जास्त विचार करणार नाही. आमच्यासाठी संजय दत्त एक महत्वपूर्ण व्यक्ती असून, त्याच्या फेरविचार याचिकेचा स्वीकार झाला नाही, ही एक वाईट बातमी आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. पैकी १८ महिन्यांची शिक्षा त्याने भोगली आहे, आता त्याला साडेतीन वर्षांची शिक्षा भोगायची आहे. या निकालानंतर न्यायालयाने संजयला शिक्षा भोगण्यास हजर होण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपत आली असतानाच संजय दत्तने चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करायचे असल्याने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. त्यावेळी न्यायालयाने त्याला चार आठवड्याची मुदत वाढवून दिली होती.
संजय दत्तला त्याच्या चार चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करायचे होते. ज्याचे एकंदर बजेट २७८ कोटी रुपये इतके आहे. यात राजू हिरानी यांचा ‘पीके’, करन जोहरचा ‘उंगली’. अपूर्व लखियाचा ‘जंजीर’ या सारख्या बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पुलिसगिरी’, ‘जंजीर’ आणि ‘पीके’  या चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे समजते. ‘शेर’ या चित्रपटातील संजयच्या एका गाण्याचे चित्रीकरण बाकी आहे. ‘तक्रार’ आणि अग्रवाल यांचा आणखी एक चित्रपट ‘वसूली’ यांचे चित्रीकरण होणे अद्याप बाकी आहे.

Story img Loader