१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब) आणि इन्सोमनियाचा त्रास जाणवत आहे.
तुरुंगातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्या पायांना कमी रक्त पुरवठा होत असून, त्यास चालण्यास त्रास होत असल्याचे आढळून आले. मोठ्या प्रमाणात धुम्रपान आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे संजय दत्तला हा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात सीटी ऍन्जिओग्राम आणि आर्टरिअल ऍन्जिओग्राफी सुविधा नसल्याने संजय दत्तला जे.जे. रुग्णालयात पाठवण्यासाठी येरवडा तुरुंग अधिका-यांनी शासनाकडे परवानगी मागितली असल्याचे समजते.
ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डी. जी. कुलकर्णी म्हणाले, त्यांच्या रुग्णालयात सीटी ऍन्जिओग्राम करणे शक्य नसून, आर्टरिअल ऍन्जिओग्राफीसाठीच्या मशिनचे काही भाग उपलब्ध नसल्याने ते बंद अवस्थेत आहे.
दरम्यान, येरवडा तुरुंगाचे अधिकारी योगेश देसाई आणि संजय दत्तचे वकील रिझवान मर्चंट यांनी संजय दत्तच्या आजाराबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. संजय दत्तला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय चाचणीसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात येणार नसल्याचे तुरुंग अधिकारी देसाई यांनी सांगितले.

Story img Loader