मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणातील आरोपी संजय दत्तचा १९ एप्रिल १९९३ ते २५ फेब्रुवारी २०१६ असा गजाआडचा प्रवास प्रामुख्याने तीन टप्प्यात झाला. त्या प्रवासातील त्याच्या काही चित्रपटाच्या या नोंदी…
खलनायक – या चित्रपटाच्या यशाने तो सुपरस्टारपदी झेप घेईल अशी चर्चा असतानाच त्याला पहिल्यांदा अटक झाली आणि या चित्रपटाचे प्रदर्शन अडचणीत आले. ‘चोली के पिछे क्या हैं’ या द्विअर्थी गाण्याचाही वाद होताच. ५ मे १९९३ रोजी संजय दत्त जेलबाहेर आला आणि ‘खलनायक’च्या प्रदर्शनाचे पक्के ठरले. एकूणच सामाजिक-सांस्कृतिक वातावरण संजय दत्तच्या विरोधात असल्याने या चित्रपटाचे काही खरे नाही असे वाटले. प्रत्यक्षात ऑगस्टच्या दुसऱ्या शुक्रवारी झळकलेल्या या चित्रपटाने गल्ला पेटीवर धूम माजवली.
त्रिमूर्ती – सुभाष घई निर्मित आणि मुकुल आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचा जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील १९९३ च्या दिवाळीच्या दिवसाच्या मुहूर्ताच्या वेळी त्यामध्ये जॅकी श्रॉफ आणि शाहरुख खानसोबत संजय दत्त होता. पण ४ जुलै १९९४ रोजी संजय दत्तला पुन्हा गजाआड जावे लागले म्हणून त्याच्या जागी अनिल कपूर आला.
प्रेमग्रंथ – राजीव कपूर दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त आणि जुही चावला (अथवा माधुरी) अशी जोडी जमवली जात असून त्यामुळे आपली आई नर्गिसनंतर संजय दत्त आर. के.च्या चित्रपटापासून भूमिका साकारेल अशी चर्चा होती. पण यातूनही संजय दत्तला बाहेर पडावे लागले आणि ऋषि कपूर-माधुरी जोडी जमली.
महानता – १७ ऑक्टोबर १९९५ रोजी संजय दत्त दुसऱ्यांदा जेलबाहेर आला. तेव्हा त्याच्या रखडलेल्या चित्रपटांचे पूर्ण होणे गरजेचे होते. त्यातील ‘महानता’तर माधुरीबरोबरचा! त्याच्या नटराज स्टुडिओतील प्रेमगीताच्या चित्रीकरणाच्यावेळी आम्हा सिनेपत्रकारांना सेटवर बोलावले असता या दोघांच्या देहबोलीत कमालीची अलिप्तता जाणवली. त्यामुळे तेच वाचकांसमोर मांडले गेले.
पीके – २१ मार्च २०१३ रोजी संजय दत्त आणखी एकदा गजाआड जाताच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे काय असा प्रश्न गाजला? पण तत्पूर्वीच त्याने घाईघाईत आणि भरपूर मेहनत घेत आपले चित्रीकरण पूर्ण होवू दिले.
या सगळ्या प्रवासात त्याने ५५१ दिवस गजाआड काढले तरी त्याच्यातील ‘अभिनेता’च्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झाल्याचे जाणवले नाही हे विशेष.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2016 रोजी प्रकाशित
संजय दत्तचा गजाआडचा प्रवास आणि त्याचे चित्रपट
खलनायक चित्रपटाने गल्ला पेटीवर धूम माजवली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-02-2016 at 12:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt released from jail