बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवाडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तने तुरूंग प्रशासनाकडे दोन आठवड्यांच्या रजेसाठी विनंती केल्याचे समजते. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच संजय दत्तच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल असे तुरुंग प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. यापूर्वी पत्नी मान्यता दत्तच्या आजारपणाच्या कारणासाठी संजय दत्तला एक महिन्याची रजा मंजूर करण्यात आली होती. तर गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये तो स्वत: आजारी असल्यामुळे त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते. मध्यंतरी याप्रकरणावरून बराच गदारोळदेखील निर्माण झाला होता. आघाडी सरकार असताना संजय दत्तला वारंवार सुट्टी मिळत असल्याने भाजपा व अन्य पक्षांची टीका केली होती. गृहमंत्री आर.आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य ठरत होते. संजय दत्तला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोपही भाजपाने केला होता. आता राज्यात भाजपाची सत्ता असून गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे आता संजूबाबावर भाजपाही कृपादृष्टी दाखवेल का याविषयी चर्चा रंगली आहे.
पुढील आठवड्यात संजय दत्त आणि आमीर खान यांच्या भूमिका असलेला ‘पीके’ हा चित्रपट प्रसिद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तसाठी येरवाडा तुरूंगात या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करता यावे, यासाठी आमीरकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ४२ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली होती.    

Story img Loader