sanjay-dutt-maanyata
अभिनेता संजय दत्त १४ दिवसांची फर्लो रजा संपवून पुन्हा गुरुवारी दुपारपर्यंत तुरुंगवास भोगण्यासाठी येरवाडा तुरूंगात परतणे अपेक्षित होते. परंतु, संजूबाबा अजूनही तुरूंगात दाखल झालेला नाही. आपल्या रजेत वाढ व्हावी यासाठी केलेल्या विनंती अर्जावर काय निकाल लागतो याच्या प्रतिक्षेत संजूबाबा होता परंतु, निकाल लागलेला नसल्यामुळे येरवडामध्ये दाखल होण्यास गेलेला संजय दत्त तुरूंगाबाहेरूनच पुन्हा मुंबईकडे रवाना झाला आहे.
रजा वाढवून देण्याच्या अर्जावर जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत संजय दत्तला तुरूंगाबाहेर राहण्याची मुभा असल्याचा दावा त्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी केला आहे. त्यानुसारच संजय दत्त पुन्हा माघारी फिरला आहे.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हत्यार बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मे 2013 पासून तुरुंगात असलेल्या संजय दत्तने आत्तापर्यंत ४२ महिन्याचा तुरुंगवास पूर्ण केला आहे. मे 2013 ते मे 2014 दरम्यान पॅरोल किंवा फर्लोच्या माध्यमातून त्याने ११८ दिवसांची रजा घेतली आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या गृहखात्याने संजय दत्तबाबत दाखविलेल्या सहानुभूतीविषयी उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता. संजय दत्तला वारंवार मिळत असलेल्या रजेचा अनेक सामाजिक संस्थांकडूनदेखील निषेध करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने संजय दत्तच्या रजेच्या अर्जावर जसा सहानुभूतीपूर्वक विचार केला जातो, तसे इतर कैद्यांच्याबाबतीत आढळून येत नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले. दरम्यान, संजय दत्तने ‘पीके’ चित्रपटाच्या खेळाला उपस्थिती लावून, तसेच जवळचे मित्र आणि कुटुंबियांसमवेत नवीन वर्षाचे जोरदार सेलिब्रेशन करीत आपल्या रजेचा पुरेपुर उपभोग घेतला.

sanjay-dutt-aamir-khan

 

Story img Loader