प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी हॉलिवूड अॅक्शन दिग्दर्शक स्पिरो रझाटोसची निवड केली आहे. ‘जझबा’ नावाच्या या चित्रपटात ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘बॅक टू दी फ्युचर’ (१९८५), ‘फास्ट अॅण्ड फ्युरीयस ६’ (२०१३) आणि अलिकडच्या काळातील ‘कॅप्टन अमेरिका’सारख्या चित्रपटांमधील उत्कृष्ट हणामारीच्या दृष्यांसाठी स्पिरो ओळखला जातो. लवकरच तो मुंबईत दाखल होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ‘काटें’ आणि ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात अॅक्शन दृष्ये साकारणारा स्पिरो पहिल्यांदाच चित्रीकरणासाठी मुंबईत येत आहे. ‘जझबा’ हा एक अॅक्शनपट असून, ऐश्वर्या रायबरोबर अन्य दोन सह-अभिनेते दिसणार आहेत. अन्य कलाकारांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेण्याचे बाकी असले, तरी २०१५ च्या सुरुवातीला चित्रीकरणास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.