अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. गेल्या काही वर्षांपासून सलमान सतत अॅक्शनपटांमध्ये झळकत आहे. या दरम्यान त्याने कोणत्याही प्रेमकथेवर आधारित चित्रपट केल्याचं फारसं आढळून आलं नाही. १९९९ मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटामध्ये तो झळकलं होता. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे आजही त्याचा हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केल्याचं पाहायला मिळालं नाही. मात्र तब्बल १९ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा  एकत्र काम करणार आहे.

संजय लीला भन्साळी एका नव्या चित्रपटाची निर्मिती करत असून त्यांच्या या चित्रपटामध्ये सलमान झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण २०१९ मध्ये सुरु होणार असून पुढील वर्षी २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

दरम्यान, हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. विशेष म्हणजे तब्बल १९ वर्षानंतर एकत्र काम करत असल्यामुळे संजय लीला भन्साळी आणि सलमान प्रचंड आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. संजय लिला भन्साळी सध्या एकाच वेळी तीन प्रोजेक्टवर काम करत आहेत. त्यांच्या या तिन्ही प्रोजेक्टमध्ये तगडी स्टारकास्ट झळकणार असल्याचं सांगण्यात येत असून या तीनपैकीच एका चित्रपटात सलमान काम करणार आहे.

 

Story img Loader