अभिनेता शरद केळकरने मराठीसह बॉलीवूडमध्येही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. शरदने १९ वर्षांच्या करिअरमध्ये विविध माध्यमांमध्ये काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अलीकडेच अभिनेत्याने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत ‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवरील काही अनुभव सांगितले आहेत. ‘रामलीला’मधील शरद केळकरच्या ‘कांजी भाई’ भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
अभिनेता शरद केळकर म्हणाला, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची कला, त्यांचे विचार हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. त्यांचे कलेवर असलेले प्रेम मी माझ्या डोळ्यासमोर पाहिले आहे. जोपर्यंत त्यांना मनासारखा शॉट मिळत नाही तोपर्यंत ते उपस्थित सगळ्या कलाकारांकडून मेहनत करून घेतात.
हेही वाचा : केवळ ‘या’ कारणाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला केलेलं रिजेक्ट, धक्कादायक अनुभव सांगत म्हणाला…
शरद केळकर पुढे म्हणाला, “‘रामलीला’मधील एका गाण्याचे शूटिंग फिल्मसिटीमध्ये सुरु होते. पहिल्याच दिवशी त्या सेटवर मुख्य कलाकारांसह जवळपास १ हजार डान्सर्स उपस्थित होते. गाण्याचे शूट सुरु असताना सेटवरील लांबचा एक दिवा विझल्याचे संजय सरांनी पाहिले. दुसऱ्या एखाद्या दिग्दर्शकाने जाऊदे अजून ५० दिवे आहेत असा विचार करून शूट तसेच सुरु ठेवले असते परंतु, संजय लीला भन्साळींनी आणखी एक टेक घेऊया सांगत ‘तो एक दिवा विझलाय…आधी लावा’ असे सांगितले होते. एवढी लहानशी चूक दुरुस्त करीत त्यांनी गाण्याचे शूटिंग नव्याने सुरु केले. तेव्हा मला त्यांचे कलेवर किती प्रेम आहे हे कळाले.”
“गाण्याची रिहर्सल करण्यासाठी आमच्याकडे एक दिवसाहून अधिक वेळ होता. मला तेव्हा वाटले हे लोक किती पैसे वाया घालवतात एवढ्यात एखाद्या मालिकेचे १३ ते १५ मिनिटांचे शूटिंग पूर्ण झाले असते. पण, जेव्हा या सगळ्या शूटिंगनंतर मी चित्रपट पाहिला तेव्हा मी संजय सरांना मिठी मारली होती.”, असे अभिनेता शरद केळकर म्हणाला. दरम्यान, ‘रामलीला’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तसेच अभिनेता शरद केळकरने चित्रपटात दीपिका पदुकोणच्या मोठ्या भावाची (कांजी भाई) भूमिका साकारताना दिसला होता.